पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन टोळक्याने दहशत माजविल्याची घटना कोथरुड भागात घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निखिल शिंदे (वय २२, रा. पौड रस्ता, कोथरुड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. शिंदे याच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी साहिल विनायक जगताप (वय २५, रा. हनुमाननगर, केळेवाडी, कोथरुड) याला अटक करण्यात आली आहे. जगताप याच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> यंदा पुणे शहरात २०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद

शिंदे आणि जगताप हे केळेवाडी परिसरात राहायला आहेत. शिंदे आणि त्याचा मित्र अमोल अवचिते मध्यरात्री केळेवाडीत शेकोटी पेटवून गप्पा मारत बसले होते. त्या वेळी आरोपी जगताप आणि साथीदार तेथे आले. ‘पोलिसांना आमची माहिती देतो का?’ असे म्हणून शिंदे याच्यावर कोयत्याने वार केला. शिंदेने कोयत्याचा वार हातावर झेलल्याने त्याच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर शिंदे आणि त्याचा मित्र अवचिते दुचाकीवरुन रुग्णालयात निघाले असताना जगताप आणि साथीदारांनी त्यांचा पाठलाग करुन पौड रस्त्यावरील दिगंबर हॉलजवळ दुचाकी अडविली.

हेही वाचा >>> पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार ; तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा

जगताप आणि साथीदारांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली. शिंदे आणि त्याचा मित्र अवचिते यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन आरोपी पसार झाले.खुनाचा प्रयत्न करणे आणि दहशत माजविल्या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चैतन्य काटकर तपास करत आहेत.