महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत सन २०१७ पासून २०२० या कालावधीत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, लाभाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी आवश्यक असल्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी आधार बंधनकारक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांनी या तीन वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची बँकेच्या मंजूर धोरणानुसार विहित मुदतीत परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांनी संबंधित कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आणि त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम सन २०१८-१९ किंवा सन २०१९-२० या वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेइतका प्रोत्साहन पर लाभ देण्यात येणार आहे. मात्र, त्याकरिता बँक खात्याला आधार जोडणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणी आवश्यक आहे. आधार कार्ड नाहीत अशा पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ ‘आपले सरकार सेवा’ केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड काढावे आणि ते आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करावे. तसेच आधार कार्ड बचत खात्यास जोडलेले नाही, त्यांनीही बँकेच्या शाखेत संपर्क साधून आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी.- मिलिंद सोबले, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे ग्रामीण