scorecardresearch

पुण्यातील पाणी टंचाई आणि टँकर माफियांविरोधात ‘आप’ आक्रमक; बालगंधर्व रंगमंदिर चौकात केले आंदोलन

पाणीपट्टी भरूनही पुन्हा टँकरचे पैसे का द्यायचे? असा सवाल देखील केला आहे.

पुणे शहरातील पाणीटंचाई आणि टँकरमाफियांच्या विरोधात आम आदमी पार्टी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याविरोधात ‘आप’कडून आज (रविवार) बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. महानगरपालिका नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करत असताना नागरिकांनी पुन्हा टँकरचे पैसे का द्यायचे? असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. गृहसंकुलांना, सोसायट्यांना पाणी द्या किंवा टँकर आणण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आपचे राज्य संघटक, पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार, डॉ. अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे, श्रीकांत आचार्य, मंजुषा नयन, प्रभाकर कोंढाळकर, किरण कद्रे, गणेश ढमाले, ज्योती ताकवले, वैशाली डोंगरे, आनंद अंकुश, किरण कांबळे उपस्थित होते.

“महानगरपालिकेने आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्यावे आणि ते जर जमत नसेल तर टँकरचे पैसे द्यावेत. टँकर विकत घेऊन पाणी पिणे हे आता नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळेच ‘पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या’ अशी मागणी आम्ही करत आहोत.”, असे विजय कुंभार यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील मोठ्या संख्येने गृहनिर्माण संस्थांकडून पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. महानगरपालिका हद्दीत शेजारील अनेक गावांचे विलीनीकरण केल्यामुळे, शहराचा विस्तार झपाट्याने झाला आणि दूरवरच्या भागात अनेक निवासी वसाहती निर्माण झाल्या आहेत. या भागात मागणीनुसार पुरेसा पाणीपुरवठा करण्यात पुणे महानगरपालिकेच्या असमर्थतेमुळे पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास ‘आप’कडून तीव्र आंदोलन केले जाईल, असे पक्ष प्रवक्ता डॉ. अभिजित मोरे आणि सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aap aggressive against water scarcity and tanker mafias in pune print news msr

ताज्या बातम्या