पुणे : ‘आरोग्य स्वराज्य हा नुसता आरोग्याचा कार्यक्रम नाही, तर राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तन असून, एका मोठ्या परिवर्तनाची सुरुवात आहे. त्यामुळे ही एक आरोग्य चळवळ व्हायला हवी,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी बुधवारी व्यक्त केले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात ‘एमकेसीएल’चे सहसंस्थापक प्रा. राम ताकवले स्मृती व्याख्यान कार्यक्रमात बंग यांनी ‘आरोग्य स्वराज्य’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर अध्यक्षस्थानी होते.

बंग म्हणाले, ‘भारताचे सरासरी आयुर्मान वाढले असले, तरी वैद्यकीय सेवा गरिबी निर्माण करण्याचे साधन बनत चालली आहे. युरोपात आरोग्य सेवेचा खर्च सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) १० टक्के, तर अमेरिकेत हाच खर्च १८ टक्के आहे. मात्र, भारतात हा खर्च जेमतेम तीन टक्के आहे.’

‘भारताचे मध्यमवर्गीयकरण होत आहे, आयुर्मान वाढत आहे, जीवनशैली बदलत आहे, रोगांचे स्वरूपही बदलत आहे. मात्र, शंभर वर्षे कसे जगावे आणि आजारी पडल्यास सर्वांना प्राप्त होतील, असे उपचार कसे मिळतील, हे आरोग्य सेवेपुढील सर्वांत मोठे आव्हान आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
‘ग्रामीण भागात सामुदायिक आरोग्य सेवेची व्यवस्था उभी करावी लागेल, तर शहरी भागात आरोग्यदूत तयार करावे लागतील. यातून आरोग्य सेवेवर सकारात्मक आणि व्यापक परिणाम होतील,’ असे बंग यांनी सांगितले.

आरोग्य स्वराज्यामध्ये आहारशैली महत्त्वाची असल्याचे नमूद करून ते म्हणाले, ‘मैदा, साखर नको, पीठ चाळू नये, तांदूळ पॉलिश करू नये, प्रक्रिया केलेले, बेकरीचे अन्न वर्ज्य करावे, निरोगी राहण्यासाठी थोडे अन्न सावकाश खावे आणि महत्त्वाचे म्हणजे आहार बेचव असावा.’ काकोडकर म्हणाले, ‘शिक्षण आणि स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींचे एकत्रीकरण करायला हवे. शिक्षणात केवळ बालकांच्या आरोग्याचा विचार असतो. परंतु, आरोग्य हे केवळ बालशिक्षणापुरते मर्यादित न राहता, मानवी क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने विचार आवश्यक आहे. त्यासाठी संशोधन अधिक महत्त्वाचे आहे. त्या पद्धतीचे संशोधन व्हायला हवे.’

‘एमकेसीएल’चे मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांनी प्रास्ताविक केले. रेवती देऊळगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

आरोग्य सेवेबाबत डॉ. अभय बंग मांडलेले मुद्दे

  • आरोग्य सेवा कमी खर्चाची हवी.
  • ती सगळ्यांना उपयुक्त आणि उपलब्ध हवी.
  • सामुदायिक किंवा विश्वस्त पद्धतीने सेवा देणाऱ्या संस्था हव्यात.
  • मानवी चेहरा, चांगली गुणवत्ता चांगली आणि खर्च कमी असावा.