पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात अभय फिरोदिया यांनी मुलांना मराठी येत नसल्याबद्दल दुःख होत असल्याची भावना व्यक्त केली. याच कार्यक्रमात त्यांनी वाहन उद्योग, फिरोदिया समूहाचा व्यवसाय आणि सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरही भाष्य केले.

‘उद्योगांना १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि त्यावर नोंदणी कर इत्यादी शुल्क भरावे लागते. एका गाडीमागे सरकारला जितके पैसे मिळतात, त्याच्या केवळ एक तृतीयांश पैसे वाहन उद्योगात कमावता येतात,’ अशा शब्दांत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी वाहन उद्योगांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली.

‘वाहन उद्योग करणारे केवळ नफा मिळविणारे असल्याच्या समजुतीमुळे वाहन उद्योगांवरच नव्हे, तर सगळ्याच उद्योगधंद्यांवर अन्याय झाला. कोणालाही उद्योग वाढवता आला नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात फिरोदिया बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते.

फिरोदिया म्हणाले, ‘आपल्या समाजवादी राज्यकर्त्यांनी वाहन उद्योगावर अत्याचार केले. व्यापार म्हणजे लबाडी, उद्योग म्हणजे कामगारांचे शोषण, पैसे म्हणजे भ्रष्टाचार, अशा प्रकारची तेढ त्यांच्या मनात होती. १९८० मध्ये प्रीमियर ऑटोमोबाइल आणि हिंदुस्तान मोटर्स या दोन कंपन्यांनी जपानच्या निसान मोटर्सपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वाहनांची निर्मिती केली. मात्र, सरकारी धोरणांमुळे या कंपन्यांना विस्तार करता आला नाही. त्यात कामगार संघटनांद्वारे नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी उद्योगांचे नुकसान केले. या युनियनबाजी, भांडणांमुळे वाहन उद्योगांचे मोठे नुकसान झाले.’

‘ज्ञान आणि परंपरा यांचा अनोखा मिलाफ भारतीय संस्कृतीत आहे. ही मूल्ये म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. ती जपणे सध्याच्या काळाची गरज आहे. जैन, बौद्ध, शीख आणि वैदिक या सर्व परंपरांचे तत्त्वज्ञान एकच आहे. हे तत्त्वज्ञान ‘अभय प्रभावना’ या कायमस्वरूपी प्रदर्शनाच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न करत असून, आपल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित व्हावा म्हणून काम करणार आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘मुलांना मराठी येत नसल्याचे दु:ख’

‘माझे शिक्षण मराठीतून झाले. मला मराठी चांगली बोलता येते. मात्र, मुला-मुलींना मी इंग्रजी शाळेत घातले. त्यामुळे त्यांना नीट मराठी बोलता येत नाही. ते मराठी वाचत नाहीत. याचा अर्थ ते हुशार नाहीत, असे नाही. पण, मराठी भाषेबरोबर प्रेमाचे नाते काहीसे कमी आहे, या गोष्टीचे दुःख वाटते,’ अशी खंतही अभय फिरोदिया यांनी व्यक्त केली.