Abhijeet Dipke Cockroach Janata Party Protest Pune : देशात जेव्हा जेव्हा आंदोलने झाली तेव्हा तेव्हा आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण आंदोलनाच्या माध्यमातूनच स्वतंत्र झालो आहोत. लोकशाहीमध्ये आंदोलने महत्त्वाची आहेत. आम्हाला ‘फेक’ म्हणण्यापेक्षा व्यक्त होणाऱ्या तरुणांचे म्हणणे समजून घ्यावे. मात्र हे सरकार त्याबाबत चर्चात करच नाही, अशी माहिती ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिली. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने या आंदोलनाची पुण्यातून सुरुवात करून भविष्यात नागपूर, लखनऊ आणि बेंगळुरू येथेही आंदोलने केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘नीट’, सीबीएसईसह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याच्या या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आज ( ११ जून) दुपारी ४ वाजल्यापासून शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंबर चौधरी, अॅड. असीम सरोदे, माहिती अधिकार कार्यकर्ता विजय कुंभार यांनी पाठिंबा दिला.

देशभरातील एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे अन्याय झाला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत. सरकारशी चर्चा करण्याचीही तयारी आहे. मात्र, आमची भूमिका आणि विचार समाजमाध्यमांवरून दडपण्याचा प्रयत्न होत आहे,’ असा आरोप दिपके यांनी केला. आमच्याबरोबर धोरणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, अभ्यासक मंडळी आहेत. त्यामुळे शिक्षणातील प्रश्नांबाबत सविस्तर अभ्यास करून पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉ. चौधरी म्हणाले, ‘ दिपके यांनी सुरू केलेले आंदोलन गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अहिंसक विचारांवर आधारित आहे. लोकशाही वाचवण्यासाठी जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्याबरोबरच अशा आंदोलनांची विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे.’

सरकारने या प्रश्नावर संवेदनशीलतेने प्रतिसाद देण्याची गरज अॅड. सरोदे यांनी व्यक्त केली. ‘परीक्षांमधील गैरव्यवस्थांमुळे विद्यार्थ्यांचे जीव जात असताना सरकार गंभीरपणे प्रतिसाद देताना दिसत नाही. चुका मान्य करून माफी मागण्याची प्रवृत्ती सत्ताधाऱ्यांमध्ये दिसून येत नाही,’ अशी टीका त्यांनी केली.