पुणे : ‘शहरे हवामान बदलाची केंद्रे होत आहेत. इमारतींमधून सर्वाधिक कार्बन उत्सर्जन होते. ते कमी करण्यासाठी राज्याच्या शीतकरण कृती आराखड्याची (कूलिंग ॲक्शन प्लॅन) अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये ‘ऊर्जाबचत शीतकरण प्रणाली’च्या वापरातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,’ असे ‘राज्य हवामान कृती कक्षा’चे संचालक डॉ. अभिजित घोरपडे यांनी सांगितले.
‘भवताल फाउंडेशन’ आणि ‘मायक्रो इनोटेक’ यांच्या वतीने ‘हवामान बदलाचे आव्हान पेलायचे कसे?’ या विषयावर ‘भवताल टॉक’मध्ये डॉ. घोरपडे बोलत होते. या परिसंवादात हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल आणि डॉ. विनीत कुमार सिंग सहभागी झाले होते. ‘मायक्रो इनोटेक’चे राजेश पवार, संस्थेचे अध्यक्ष अभिजित घोरपडे, देवानंद लोंढे या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
डॉ. घोरपडे म्हणाले, ‘वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, अनियमित पर्जन्यमान, समुद्राच्या पातळीत वाढ, दुष्काळ, पूर आणि चक्रीवादळे अशा हवामान बदलांची वारंवारिता आणि तीव्रता सातत्याने वाढते आहे. गेल्या पाच दशकांत उष्ण दिवसांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या दशकात, दुष्काळाची वारंवारता दुप्पट झाली, चक्रीवादळे तिप्पट झाली आणि पुराचे प्रमाण चौपट झाले आहे. राज्यातील काही जिल्हे आता दुष्काळ आणि पूर दोन्हीसाठी असुरक्षित आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत.’
डॉ. कोल म्हणाले, ‘कार्बन उत्सर्जनाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे समुद्राचे तापमानही वाढत आहे. परिणामी पावसाचे प्रमाणही बदलत असून, अनियमित आणि अनियंत्रित पाऊस पडतो आहे. शेतीचे नुकसान हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. समुद्राची पातळी प्रत्येक दशकाला तीन सेंटिमीटरने वाढल्याने प्रतिदशक समुद्रकिनाऱ्यालगतची १७ मीटर जमीन पाण्याखाली जात आहे. समुद्र आता घरांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यावर नियंत्रणासाठी कठोर आणि दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.’
‘तापमानवाढीमुळे चक्रीवादळांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तुलनेने शांत असलेल्या अरबी समुद्रातील वादळांची संख्या आणि त्यांचा वेग वाढतो आहे. गेल्या दोन दशकांत चक्रीवादळांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली असून, वेग १५० किलोमीटर प्रतितास एवढा झाला आहे. वादळे कधी तीव्र होतात, तर कधी लवकर निष्क्रिय होतात. वादळाने उग्र रूप धारण केल्यावर पुढील १२ तासांचा अंदाज देण्यासाठीची यंत्रणा अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे,’ असे डॉ. विनीत सिंह यांनी सांगितले. घोरपडे यांनी प्रास्ताविक, तर त्रिलोक खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले.