पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी हाती असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपचे अभिषेक बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व असल्याने बारणे यांची निवड निश्चित असून केवळ औपचाकरिता बाकी आहे. शनिवारी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केला नसल्याने बारणे यांची बिनविरोध निवड होणार आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बारणे यांच्याबरोबर वाकडचे प्रतिनिधीत्व करणारे संदीप कस्पटे, रहाटणीतून दुसऱ्यांदा निवडून आलेले बाबा त्रिभुवन यांच्यात चुरस होती. परंतु, पक्षश्रेष्टींनी बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार अभिषेक बारणे यांनी नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमहापौर शैलजा बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे यावेळी उपस्थित होते.
अध्यक्षपदासाठी शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयात निवडणूक प्रक्रिया होणार आहे. यासाठी स्थायी समितीच्या सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
स्थायी समितीमध्ये भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे चार आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचा एक सदस्य आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपचे बारणे यांची अध्यक्षपदी निवड निश्चित असून केवळ औपचारिकता बाकी आहे. शनिवारी अधिकृतरित्या त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.
कोण आहेत अभिषेक बारणे?
महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती घेणारे अभिषेक बारणे दुसऱ्यांदा भाजपकडून निवडून आहेत. थेरगाव भागाचे ते महापालिकेत प्रतिनिधीत्व करतात. मागील पंचवार्षिकमध्ये बारणे यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. ‘ग’ प्रभागाचे अध्यक्षपही त्यांनी भूषविले आहे. आमदार शंकर जगताप यांचे अतिशय निकटवर्तीय अशी बारणे यांची ओळख आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या थेरगावातून सलग दुसऱ्यांदा अभिषेक बारणे निवडून आले आहेत.
स्थायी समितीचे सदस्य
अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन (भाजप), सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि सुलभा उबाळे (शिवसेना)

