पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गुणवत्तेच्या जोरावर झेप घेण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी प्रशासनाने दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. कुलगुरू म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ अत्यंत समाधानाचा होता. कुलगुरूपद स्वीकारताना ठरवलेल्या योजनांपैकी प्रशाला प्रणाली, १३० सामंजस्य करारांद्वारे शिक्षण आणि उद्योगाला जोडणे, संशोधनाला चालना अशा काही गोष्टी साध्य झाल्या, तर प्राध्यापकांची भरतीसारख्या काही पूर्ण करायच्या राहिल्या अशी भावना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केली.

डॉ. करमळकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ आज (१८ मे) संपत आहे. या निमित्ताने डॉ. करमळकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वेगवेगळय़ा मुद्दय़ांवर भाष्य केले. कुलगुरू म्हणून जबाबदारी घेतल्यावर काही गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या. त्यानुसार विद्यापीठात प्रशाला प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली. नवी बांधकामे करण्यापेक्षा रखडलेली बांधकामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले. शिक्षणाला उद्योग क्षेत्राशी जोडण्यात यश आले. आयुका, सीडॅकसारख्या राष्ट्रीय संस्थांना सोबत घेऊन नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती केली. संशोधन, नवउद्योजकांना चालना देण्यासाठी विद्यापीठाअंतर्गत दोन कंपन्यांची स्थापना केली. विद्यापीठाचे क्रमवारीतील स्थान काही प्रमाणात उंचावले.

विद्यापीठ समाजाभिमुख होण्यासाठी वेगवेगळय़ा संस्था-उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना सामंजस्य कराराच्या माध्यमातून जोडले. कतारमध्ये विद्यापीठाचे शैक्षणिक केंद्र सुरू झाले. या सगळय़ाचा परिणाम येत्या काळात दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही काळात विद्यापीठातील शिक्षकांची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. शिक्षकांची निकड असताना भरती होऊ शकली नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने कामकाज करावे लागत आहे. करोना प्रादुर्भावामुळे पारंपरिक शिक्षणाला डिजिटल शिक्षणामध्ये रुपांतरित करणे आव्हानात्मक होते, असेही ते म्हणाले.

गुणवत्तेच्या जोरावर मोठी झेप घेण्याची विद्यापीठामध्ये नक्कीच क्षमता आहे. मात्र त्यासाठी प्रशासनाला आपल्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. विद्यार्थिदशेत पुणे विद्यापीठात प्रवेश केला. पण विद्यार्थी असताना किंवा प्राध्यापक म्हणून काम करतानाही कधी याच विद्यापीठाचा कुलगुरू होईन असा कधी विचारही केला नव्हता. पाच वर्षांचा कार्यकाळ समाधानकारक होता. या काळात विद्यापीठासाठी योगदान देता आल्याचा आनंद आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भविष्यातील योजना

भूशास्त्रज्ञ असलेले डॉ. करमळकर यांना आता येत्या काळात त्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रासाठी अधिक वेळ द्यायची इच्छा आहे. तसेच डेक्कन कॉलेजमध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कन्टेम्पररी इंडॉलॉजीची स्थापना करण्याचा प्रस्ताव त्यांनी तयार केला आहे. त्यासाठी काम करण्याचे त्यांचे नियोजन आहे.