भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना चांगलेच टोले लगावले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी पुण्यात आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक धक्कादायक  विधान  केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रीपद देऊ नये असा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता’ असा गौप्यस्फोट केला. याला धरूनच पहाटे जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र शपथ घेतली होती. तेव्हा हाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला होता का?असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “याची गरजच नव्हती. कारण देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात. राज्यात काय चाललय याबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका, शिवसेनेने सतत त्रास दिल्यानंतरही महाराष्ट्रात सलग पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहीले आहेत. तेव्हा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु देवेंद्र फडणवीस हे सर्वांना पुरुन उरले.”

हसन मुश्रीफ यांच्यावर ओढले ताशेरे

यावेळी सोमय्या प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर ताशेरे ओढले. “गेल्या २४ तास अख्ख्या महाराष्ट्राने दंडुकेशाही म्हणजे काय पहिली आहे. मोघलाई म्हणजे काय, लोकशाहीचा खून म्हणजे काय पाहिलं, पॅनिक होऊन काम करायचं नसतं असं माझं मुश्रीफ साहेबांना आवाहन आहे.”, असे पाटील म्हणाले. 

शरद पवारांचं नाव घ्यायची यांची लायकी आहे का? हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांवर संतापले!

लवकरच तिसरा आरोप होणार

पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाला त्यांनी उत्तर दिले पाहिजे आणि कायद्याची लढाई कायद्याने लढावी. ती चपलेने लढू नये. कारखान्यामध्ये ९८ कोटी रुपये ज्या कंपन्यातून आले त्या कंपन्या कोठे आहेत आणि कोलकत्याच्या कंपन्यांनी थेट कोल्हापूर जिल्ह्यात गुंतवणूक कशी केली यावर बोलावे. मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या पहिल्या आरोपांवर अजून उत्तर दिलेले नाही, दुसऱ्या आरोपांबाबत मूळ विषयाबद्दल बोलावे. लवकरच तिसरा आरोप होणार आहे.”

भाजपाच्या रडारवर कोणी पक्ष नव्हे तर भ्रष्टाचार

“भाजपाच्या रडारवर केवळ शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आहे हा आरोप चुकीचा आहे. लवकरच काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढली जातील. भाजपाच्या रडारवर कोणी पक्ष नव्हे तर भ्रष्टाचार, अन्याय आणि महिलांवरील अत्याचार आहे. भाजपाची ऑफर नाकारली म्हणून आरोप होतात हे हसन मुश्रीफ यांचे म्हणणे मा. प्रदेशाध्यक्षांनी खोडून काढले. मुश्रीफ यांना भाजपाने कधीही ऑफर केली नव्हती”, असे  चंद्रकांत पाटील यांनी  स्पष्ट केले.