पिंपरी : गांजाविक्रीच्या गुन्ह्यात महिनाभरापासून पसार असलेल्या कल्याणी ऊर्फ जयश्री उमेश देशपांडेला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने आंध्र प्रदेशमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थविरोधी पथकाने २४ मे २०२५ रोजी पाषाण-सूस रस्त्यावरील कल्याणी हिच्या दुकानावर छापा टाकून कारवाई केली. यामध्ये ११ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीचा गांजा, मोबाइल संच आणि रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईमध्ये पोलिसांनी कल्याणीचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे (५६, पाषाण), चुलत जावई अभिषेक विकास रानवडे (३२, पाषाण, मूळ रा. शनिवार पेठ, पुणे) आणि पुतणी ऐश्वर्या अभिषेक रानवडे ऊर्फ ऐश्वर्या नीलेश देशपांडे (२२, शनिवार पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली.

कल्याणी पसार झाली होती. तिला अटक करण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले. पथकाने स्थानिक खबरी आणि तांत्रिक विश्लेषणावरून कल्याणीचा शोध घेतला. कल्याणी ही आंध्र प्रदेश येथील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजनगरम् येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला तेथे जाऊन अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याणी देशपांडे ही सराईत आहे. तिच्यावर डेक्कन, कोथरूड, चतुःशृंगी, हवेली पोलीस ठाण्यांमध्ये खून, पिटा कायदा, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) आणि फसवणूक आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.