समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली. राज ठाकरे यांच्यात अयोध्येला जाण्याची हिंमत नाही ते घाबरले आहेत. आता तब्येतीचे कारण देत आहेत. हे त्यांचे बहाणे असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, माफ केलं तरच त्यांनी अयोध्येला जावं असं देखील अबू आझमी यांनी म्हटलं. ते रविवारी (२२ मे) पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

अबू आझमी म्हणाले, “बिचारे राज ठाकरे खूप अडचणीत आहेत. त्यांचं राजकारण संपलंय. त्यांना विचारणारे कोणी नाही. मी जेव्हा शपथ घ्यायला गेलो तेव्हा स्पीकर साहेबांना विचारलं होतं की शपथ कुठल्या भाषेत घेऊ. त्यांनी सांगितलं होतं भारतातील कुठल्याही भाषेत शपथ घेऊ शकता. मात्र, मनसेने मराठी, हिंदीवरून किती मोठा गोंधळ केला हे सर्वांनी पाहिलं आहे. उत्तर भारतीयांना त्यांनी मारहाण केली हे सर्व त्यांनी मराठी नागरिक त्यांना साथ देतील म्हणून केलं. परंतु, मराठी बांधवांनी त्यांना साथ दिली नाही.”

“…म्हणून महाविकास आघाडी राज ठाकरेंना अटक करत नाही”

“अयोध्याला कसे जाणार त्यांच्यात हिंमत नाही. राज ठाकरे यांनी जे केलं आहे ते भरावं लागेल. ज्या उत्तर प्रदेशात राम भगवान, श्रीकृष्ण यांचा जन्म झाला त्याच उत्तर भारतीयांना सन्मान द्यायला हवा होता. राज ठाकरे यांचे बहाणे आहेत. त्यांच्यात हिंमत नाही, ते घाबरले आहेत. भाजपाचा खासदार म्हणतोय त्यांना येऊ देणार नाही, हे सर्व मिली जुली आहे. उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, माफ केले तरच त्यांनी अयोध्येला जावं. सन्मानासाठी उत्तर भारतीय जीव देतील. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे म्हणून त्यांना महाविकास आघाडी अटक करत नाही. त्यांना वाटतं तसं केल्यास मतदान जाईल,” असा आरोप अबू आझमी यांनी केला. 

“भारत नरसंहाराच्या दिशेने जात आहे”

अबू आझमी पुढे म्हणाले, “बाबरी मस्जिद प्रकरणी आम्ही गुपचूप निकाल मान्य केला. आता ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरण पुढे आणलं जात आहे. देशात हाच विषय आहे का? भारत नरसंहाराच्या दिशेने जात आहे. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं आहे, पण यावर कारवाई होत नाही. महाराष्ट्रात सर्वात मोठा हिंदुत्ववादी कोण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपाचा देखील तोच प्रयत्न आहे.”

हेही वाचा : मातोश्री बंगला मशीद आहे का? राज ठाकरे यांचा राणा दाम्पत्यासह शिवसेनेवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे”

“आम्ही बाबरी मस्जिद तोडली अशी चढाओढ त्यांच्यात लागली आहे. हे सगळं मतदानासाठी सुरू आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे हे म्हणाले होते की ३० वर्ष झालं युतीत सडलो. आता तुम्ही त्यांची साथ सोडली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आलात, आमच्यासोबत सेक्युलरकडे जाणार होतात तर एक विचारायचं आहे की, सगळ्यात मोठे हिंदुत्ववादी होऊन भाजपासोबत का लढत आहात? सेक्युलरिझमचा प्रचार का करत नाही?” असे प्रश्न आझमी यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले.