पुणे : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबीयांना एक कोटी ४० लाख ६६ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश पुणे मोटार अपघात दावा न्यायधिकरणाने दिले. अपघातग्रस्त ट्रकचा विमा नसल्याने संपूर्ण रक्कम ट्रक मालक आणि चालकाने मिळून सात टक्के वार्षिक व्याजासह द्यावी, असे न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोटार अपघात न्यायधिकरणाचे सदस्य एस. आर. अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. भरपाई मिळवण्यासाठी कुटुंबीयांनी न्यायालयात ॲड. देवराम झंजाड यांच्यामार्फत दावा दाखल केला. ट्रक मालक, तसेच चालकाविरुद्ध संबंधित दावा दाखल करण्यात आला होता. २४ मार्च २०२१ रोजी अभियंता कुटुंबीयांसह मोटारीतून जेजुरीहून तुळजापूरकडे निघाला होते. मोरगाव रस्त्यावर चोरवाडी फाट्याज‌वळ समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने मोटारीला धडक दिली. या अपघातात अभियंता तरुणाचा मृत्यू झाला होता. अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक कोटी ३२ लाख रुपयांची भरपाई मिळवण्यासाठी दावा दाखल केला होता. ट्रक चालकाचा अपघाताशी संबंध नव्हता. बिघाडामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला लावला होता, असा दावा ट्रक मालक आणि चालकाने केला होता. भरपाईचा दावा फेटाळण्याची मागणी त्यांनी केली होती.

मोटार अपघात न्यायाधिकरणाने दोन्ही बाजूंचा पुरावा, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, वेतनपत्रक, बँक खाते, कंपनीचे अधिकारी, सहकाऱ्यांची साक्ष याबाबींचा विचारात घेतल्या. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. अभियंत्याचे मासिक उत्पन्न ६० हजार ५०० रुपये असल्याचे न्यायालयाने मान्य केले. भ‌विष्यातील उत्पन्नवाढ, कुटुंबीयांचे अवलंबित्व , अंत्यसंस्कार खर्च, तसेच अन्य बाबी विचारात घेऊन एक कोटी ४० लाख रुपयांची भरपाई मंजूर केली.