scorecardresearch

नवले पूलावरील अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे नाही; ‘आरटीओ’चा अहवाल पोलिसांना सादर

नवले पूल येथे २० नोव्हेंबरला रात्री एका भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडविले होते. अपघातात काही जण जखमी, तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नवले पूलावरील अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे नाही; ‘आरटीओ’चा अहवाल पोलिसांना सादर
संग्रहित छायाचित्र

पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर २० नाेव्हेंबरला झालेल्या अपघाताला संबंधित ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे कारण नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले. अपघाताचे तांत्रिक विश्लेषण करणारा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अखेर चार दिवसांनंतर पोलिसांकडे सादर केला आहे.

नवले पूल येथे २० नोव्हेंबरला रात्री एका भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडविले होते. अपघातात काही जण जखमी, तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अपघाताची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली होती. या रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे पोलीस, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नवले पूल परिसरात महामार्गावर असलेल्या त्रुटी कमी करण्यासाठी उयायोजना करण्याचे आदेश दिले होते. या अपघाताचा तांत्रिक विश्लेषण करणारा अहवाल आरटीओकडून तयार केला जात होता. त्यासाठी मोटार निरीक्षकांनी घटनास्थळ आणि ट्रकची पाहणी केली होती.

हेही वाचा: ‘सावधान! नवले ब्रिज पुढे आहे’; सतत अपघात होणाऱ्या नवले ब्रिजवर लागले अनोखे बॅनर

रस्त्यावर उताराच्या टप्प्यामध्ये मोठी वाहने ‘न्यूट्रल’ करून चालविली जातात. त्यातून अपघात होत असल्याने या अपघातात नेमके काय झाले, हे तांत्रिक अहवालात स्पष्ट होणार होते. त्यानुसार चार दिवसांनंतर आरटीओने पोलिसांकडे अहवाल सादर केला आहे.

नवले पुलावर झालेल्या अपघाताला संबंधित ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे कारण दिसून येत नाही. अपघाताचे तांत्रिक विश्लेषण करणारा अहवाल मोटार वाहन निरीक्षकांनी केला आहे. – डॉ. अजित शिंदे, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 09:31 IST

संबंधित बातम्या