मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावर कारचा टायर फुटल्याने  भीषण अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला आहे. ही कार ताशी १३० किमीच्या वेगाने जात होती. त्यावेळी या कारचे टायर फुटले आणि भीषण अपघात झाला. ही घटना सव्वाचार च्या सुमारास शिरगाव पोलिसांच्या हद्दीत घडली आहे. अपघातात एकूण चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटार दादरहून हिंजवडीला येत होती.

शाबीर खान (वय-५३ रा.मुंबई) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. आशिषकुमार पांडे (वय-४३) शिल्पा तायडे (वय-३४) हे दोघे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तर सोहेल नियाज सिद्धकी अहमद (वय-२६) राहुल शैलेश जोशी (वय-२५) (इंजिनिअर) हे दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोटारीच्या भीषण अपघात झाला. भरधाव मोटारीत चालकासह ऐकून पाच जण होते. मोटार १३० च्या गतीने धावत होती, तेव्हा भरधाव वेगात असलेल्या मोटारीचे टायर अचानक फुटले आणि चालक शाबीर खान च्या दिशेने मोटार झुकली. पुन्हा ती मुंबई च्या दिशेने झाली आणि डिव्हायडरच्या पत्र्याला घासत गेली. मोटारीच्या समोरील भाग चक्काचूर झाला असून या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती किर्तीकुमार देवरे यांनी दिली आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बुवासो जगदाळे हे करत आहेत.