मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी रात्री झालेल्या अपघातामुळे याठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज रात्री ८.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक अद्यापही पूर्ववत झालेली नाही. द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ स्कॉर्पियो गाडीने अचानक पेट घेतला. ही गाडी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. आग लागल्यानंतर स्कॉर्पियो गाडी जळून खाक झाली असली तरी गाडीतील लोक वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातानंतर गाडी मार्गावरून बाजूला घेण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात या मार्गिकेवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. गाडी बाजूला केल्यानंतर वाहने हळू हळू मार्गस्थ होत असली तरी वाहतूक पूर्वपथावर येण्यास आणखी काही वेळ लागणार आहे.



