पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान असलेल्या सात किलोमीटरच्या अंतरात अवजड वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटर वरून ४० किलोमीटर एवढी करण्यात आली आहे. वेगमर्यादा निश्चित केल्यानंतर अवजड वाहन चालकांकडून सर्रास नियम धुडकाविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

नवले पुलावर गुरुवारी (१३ नाेव्हेंबर) साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात नऊ ते दहा जण गंभीररित्या जखमी झाले. मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मागार्वर नवले पूल परिसरात घडलेल्या गंभीर स्वरूपाचे अपघात यापूर्वी घडले आहेत. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसर तब्बल सात किलोमीटर अंतर तीव्र उताराचा आहे. त्यामुळे या भागात भरधाव अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर अपघात घडले आहेत.

नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नवले पूल परिसरात झालेल्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत.

भरधाव वेगामुळे अपघात

बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पुलावर तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर मालवाहू वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात घडतात. बहुतांश अपघात अवजड वाहनांचे झाले असून तीव्र उतारावर गाडी न्यूट्रल स्थितीत चालविल्याने अपघात घडतात. न्यूट्रल स्थितीत गाडी चालविताना अचानक ब्रेक दाबल्यास ब्रेक निकामी होऊन अपघात घडतात. त्यामुळे ट्रक, टँकर अशा अवजड वाहनांसाठी बाह्यवळण मार्गावर एक स्वतंत्र मार्गिक उपलब्ध करून देण्यात आली.

वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटरहून ४० किलोमीटर एवढी करण्यात येणार आहे. या भागात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. बाह्यवळण मार्गाचा वापर करणारे अवजड वाहनचालक परराज्यातील आहेत. त्यांना वाहतूक नियमांची माहिती मिळावी, यासाठी विविध भाषेत फलक लावण्यात आले आहेत, तसेच नवले पूल परिसरात वाहतूक पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. डंपर, कंटेनर, ट्रक चालकांच्या बेदरकारपणामुळे नवले पूल परिसरात गंभीर अपघात घडले आहेत. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी दरी पूल ते नवले पूल दरम्यान गतिरोधक पट्टीका (रम्बलिंग स्ट्रीप) लावण्यात आल्या आहेत.