लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : चांदणी चौकातून कोथरूडकडे निघालेल्या एसटीच्या मालवाहू (कार्गो) बसने सिमेंट मिक्सरला धडक दिल्याने अपघात घडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी झाली.

एसटीच्या मालवाहू बसने मिक्सरला धडक दिल्यानंतर सिमेंट मिक्सर दुभाजक तोडून समोरुन येणाऱ्या दुचाकीवर आदळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार आहे. गुरुवारी सायंकाळी एसटीची मालवाहून बस कोथरुडकडे निघाली होती. त्यावेळी बसने सिमेंट वाहतूक करणाऱ्या मिक्सरला धडक दिली. त्यानंतर मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुभाजक तोडून मिक्सरने समोरुन येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस पुत्राचा ‘कार’नामा; कारची महिलेला जोरात धडक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.