पुणे : एका ७३ वर्षीय रुग्णाला शौचास काळे होणे, कमी रक्तदाब आणि अशक्तपणाचा त्रास होऊ लागला. याचबरोबर त्याची हिमोग्लोबिनची पातळीही खूप खालावली. या रुग्णाला आधी पचनसंस्थेशी निगडित कोणतीही समस्या नसल्याने अखेर डॉक्टरांनी ‘कॅप्सूल एंडोस्कोपी’द्वारे अत्याधुनिक पद्धतीने त्याची तपासणी केली. यामुळे रुग्णाचे योग्य निदान होऊन त्याच्यावर यशस्वीपणे उपचार करता आले.
या रुग्णाला हळूहळू जेवणावरील इच्छा जाणे आणि वजन कमी होणे, अशी लक्षणे होती. त्याला शौचास काळे होणे, कमी रक्तदाब आणि अशक्तपणाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला खराडीतील मणिपाल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणीत रुग्णाची हिमोग्लोबिनची पातळी खूप खालावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही पातळी वाढविण्यासाठी तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर काही काळ ही पातळी वाढून ती पुन्हा खाली घसरली. यामुळे रक्तस्रावाचे कारण शोधणे खूप आवश्यक होते.
हेही वाचा >>> गटारावर फटाके फोडताना स्फोट झाल्याने दोन मुले जखमी, सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना
सुरुवातीच्या निदान प्रक्रियेमध्ये गॅस्ट्रोस्कोपी करण्यात आली परंतु, मोठ्या आतड्यात रक्तस्राव सापडला नाही. त्यानंतर कोलोनोस्कोपीमध्येही लहान आतडे आणि लहान आतड्याच्या शेवटच्या भागाची चाचणी केल्यानंतर त्यातूनही रक्तस्रावाचे कारण सापडू शकले नाही. त्यावर ओटीपोटाची सीटी ॲन्जोप्लास्टी करण्यात आली तरीही कोणतेच ठोस निदान झाले नाही. अखेर डॉक्टरांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली कॅप्सूल एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा >>> लष्कराच्या लढाऊ ‘मिग २९’ विमानासाठी महत्त्वपूर्ण संशोधन… पुण्यातील ‘एनसीएल’कडून नवी प्रणाली विकसित!
याबाबत खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ. मंगेश बोरकर म्हणाले की, कॅमेरा कॅप्सूलने पचनसंस्थेतील प्रवास पूर्ण केल्यानंतर त्यातून मिळालेली माहिती गोळा करून तिचा अभ्यास करण्यात आला. या रुग्णाच्या मध्यांत्र आणि शेषांत्रामध्ये फोड आले होते. त्यामुळेच रुग्णाच्या आतड्यामध्ये रक्तस्राव होत होता. या अचूक निदानामुळे आम्ही योग्य पध्दतीने रुग्णावर उपचार करू शकलो. रुग्णाने उपचारांना योग्य साथ दिल्याने त्याला पाच दिवसांत घरी पाठविण्यात आले.
कॅप्सूल एन्डोस्कोपी म्हणजे काय?
कॅप्सूल एन्डोस्कोपी हे निदान उपकरण आहे. याद्वारे संपूर्ण छोट्या आतड्याची तपासणी करता येते. कारण परंपरागत प्रक्रियेमध्ये या अवयवापर्यंत पोहोचणे खूपच अवघड असते. यामध्ये रुग्णाच्या शरीरात एक अगदी छोटा कॅमेरा असलेली कॅप्सूल सोडली जाते. ही कॅप्सूल पुढील १२ ते १४ तासांमध्ये आतड्यात पोहोचते. त्यातून काही छायाचित्रे काढली जातात आणि ती बाहेर असलेला एक्स्टर्नल रेकॉर्डर नोंद करतो. या नोंदीच्या आधारे रुग्णाच्या समस्येचे अचूकपणे निदान केले जाते.