गडचिरोलीवरून पुण्यात गांजा घेऊन आलेल्या चौघांना अमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे. पोलिसांनी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांसह दोन पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून अडीच लाख रुपयांचा साडेबारा किलो गांजा जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

प्रशिक पुरुषोत्तम झाडे, विकास रेवाचंद बनसोड, वेदांती देवीदास निकोरे आणि श्यामकला सुखदेव किरंगे (सर्व रा. गडचिरोली ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. अमली पदार्थ विरोधी पथक सिंहगड रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी हिंगणे खुर्द परिसरात गांजा विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन जगदाळे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोन महिलांसह चौघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडील पिशवीतून १२ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, प्रसाद बोमदंडी, मयूर सूर्यवंशी, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, संतोष जाचक, दिशा खेवलकर आदींनी ही कारवाई केली.

प्रवासात गांजाचा वास येऊ नये म्हणून अत्तराची फवारणी
आरोपी गडचिरोलीहून पुण्यात साडेबारा किलो गांजा घेऊन आले होते. आरोपींनी खासगी प्रवासी बसने प्रवास करत पुण्यात गांजा आणला होता. प्रवासात पिशवीत ठेवलेल्या गांजाचा वास येऊ नये म्हणून आरोपींनी गांजाच्या पिशवीवर अत्तराची फवारणी केल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे.