लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत (लॉकअप) चक्कर आली. चक्कर आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. सचिन अशोक गायकवाड (वय ४७, रा. मुंढवा) असे उपचारादरम्यान मरण पावलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात गायकवाड आणि मनोहर रमेश माने (वय ३५) यांना अटक करण्यात आली होती. ७ जुलै रोजी वैद्यकीय तपासणी करून अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर दोघांना विश्रामबाग-फरासखाना पोलीस ठाण्यातील कोठडीत (लॉकअप) ठेवण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना १० ऑगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आणखी वाचा-किंमती वाढूनही मोठ्या घरांना ग्राहकांची पसंती! तुमच्या शहरातील वस्तुस्थिती जाणून घ्या… शुक्रवारी (९ ऑगस्ट) सायंकाळी गायकवाडला कोठडीत चक्कर आली. बंदोबस्तावरील पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मेंदुतील रक्तस्त्रावामुळे (सेरेब्रल हॅमेरज) गायकवाडचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी (१० ऑगस्ट) दुपारी गायकवाड याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सायंकाळी उपचारादरम्यान गायकवाडचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गायकवाड याच्या कुटुंबीयांना त्याचा प्रकृतीविषयी माहिती होती. शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान गायकवाड याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. -संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन