पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यातील पीडित मुलगी फितूर झाल्यानंतरही न्यायालयाने आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अत्याचार झालेल्या मुलीने घटनेनंतर आरोपीशी विवाह केला असल्याने साक्ष फिरवली. मात्र, वैद्यकीय पुरावे आणि सरकारी वकिलांच्या युक्तीवादामुळे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी याबाबतचा निकाल दिला. प्रेमप्रकरणातून एका १६ वर्षीय मुलीला आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणाने जानेवारी २०२० ला पळवून नेले होते. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर तपासात तिच्यावर आरोपीने बलात्कार केल्याचे उघड झाले होते. बलात्कार आणि अपहरण या कलमांन्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सुरूवातीला मुलीने न्यायालयात आरोपी विरोधात साक्ष दिली होती. दरम्यान, आरोपीने मुलीशी विवाह केला. उलटतपासणीत मुलीने आरोपीच्या बाजूने आणि सरकार पक्षाच्या विरोधात साक्ष दिली. त्यानंतर न्यायालयाने या खटल्यात पीडित मुलीला फितूर ठरवले होते. आरोपीने मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. अरूंधती ब्रह्मे आणि ॲड. शुभांगी देशमुख यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून चार साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्ह्याचा तपास लष्कर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश शिळीमकर यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजात पोलीस हवालदार ए. बी. थोरात यांनी सहाय्य केले.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद काय ?

आरोपीने केवळ शिक्षा होऊ नये म्हणून मुलीशी विवाह केला. असे प्रकार रोखण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद ॲड. शुभांगी देशमुख यांनी केला. वैद्यकीय पुरावे, रासायनिक विश्लेषण अहवाल (सी.ए. रिपोर्ट) आणि तपास आधिकाऱ्याची साक्ष महत्वाची मानून न्यायालयाने मुलगी फितूर झाल्यानंतर सरकार पक्षाकडून सादर केलेला पुरावा ग्राह्य धरला आणि आरोपीला वीस वर्षांची शिक्षा सुनावली.