पुणे : विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीतून उडी मारुन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. साहिल सादिक शेख (वय २१, रा. इंदिरानगर, बर्मा शेल, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सचिन पवार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल शेखला एका गु्न्ह्यात विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ३१ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास त्याला पोलीस ठाण्यात आणले. या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात येणार होती.
त्या वेळी शेखने लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला, तसेच उलटी होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील कक्षात त्याला ठेवण्यात आले होते. त्या वेळी पोलीस शिपाई पवार त्याच्याबरोबर होते. शेखने पवार यांचा हात झटकला. पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन पसार होण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलीस शिपाई पवार यांनी प्रसंगावधान राखून शेख याला ताब्यात घेतले. शेख याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सुगडे तपास करत आहेत. गेल्या महिन्यात मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या इमारतीतून एकाने उडी मारुन आत्महत्या केली होती.
बनावट वाहन क्रमांक वापरणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा
बनावट वाहन क्रमांकाची पाटी वापरणाऱ्या दुचाकीस्वार तरुणा विरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस हवालदार महेंद्र राऊत यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार राऊत हे कोथरूड वाहतूक विभागात नियुक्तीस आहेते. आरोपी दुचाकीस्वार तरुण ३० जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पौड फाटा चौकातून निघाला होता.
पोलीस हवालदार राऊत यांना वाहनाच्या पाटीवर असलेल्या क्रमांकाबाबत संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला अडवले. त्याची चैाकशी करुन दुचाकीच्या कागदपत्रांबाबत मागणी केली. तेव्हा आरोपी तरुणाने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत तरुणाने बनावट क्रमांकाचा वापर केल्याचे उघडकीस आले. त्याने बनावट दुचाकी क्रमांकाचा वापर का केला, तसेच तो वापरत असलेली दुचाकी चोरीची असल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. बनावट क्रमांकाचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याात आला. सहायक फौजदार कोंडे तपास करत आहेत.

