scorecardresearch

वर्तुळाकार रस्त्याचे भूसंपादन ‘समृद्धी’प्रमाणे

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन – एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे.

बाधित गावातील व्यवहारांचे मूल्यांकन करून त्यातील तफावत शोधण्याच्या सूचना

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन – एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूसंपादन समृद्धी महामार्गाप्रमाणे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तत्पूर्वी प्रकल्पामुळे बाधित गावातील व्यवहारांचे मूल्यांकन करून त्यातील तफावत शोधण्याच्या सूचना भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.   महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुलकुंडवार यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना जागा संपादित करण्याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये समृद्धी महामार्गाचे भूसंपादन करताना अवलंबलेली कार्यपद्धतीसह प्रामुख्याने बाधित गावातील तीन ते पाच वर्षांपूर्वी झालेले खरेदी विक्री व्यवहारांचे मूल्यांकन करून त्यातील तफावत दूर करून एकसूत्रता आणणे, हे करत असताना कायद्यातील तरतुदींचे पालन करावे, असे आदेश दिले.

   या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. सध्या नगर विकास विभागाच्या सूचनेनुसार मूल्यांकन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि जास्तीजास्त मोबदल्यासह कशी मदत करता येईल याकरिता समृद्धी महामार्गाप्रमाणे भूसंपादन करण्यात येणार आहे. याबाबत सात भूसंपादन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे या अधिकाऱ्यांकडून प्रथम मूल्यांकन प्रक्रियेनुसार दोन परस्पर गावांमधील जमिनींच्या व्यवहारामध्ये सर्वाधिक दराने विक्री झालेल्या जमिनींचे आणि सर्वात कमी दराने विक्री झालेल्या जमिनींची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही तफावत दूर करून ठरावीक रक्कम मोबदल्यासाठी निश्चित करून भूसंपादन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भूसंपादन अधिकारी, समृद्धी महामार्गात भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेले अधिकारी, संबंधित भूसंपादन अधिकारी या वेळी उपस्थित होते.

दहा दिवसांनी पुन्हा बैठक

दोन परस्पर गावांमधील जागांच्या व्यवहारातील तफावत शोधण्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दहा दिवसांनी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पुढील सूचना देण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Acquisition circular road highway villagers ysh

ताज्या बातम्या