पुणे : मंगल कार्यालये, उपाहारगृहे, लॉन्स, मोठय़ा सभागृहांना अवैध नळजोडांद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत राजाराम पूल ते म्हात्रे पूल या दरम्यानच्या २६ व्यावसायिक मिळकतींमधील बेकायदा १५ नळजोड तोडण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून गेल्या आठवडय़ात राजाराम पूल ते म्हात्रे पूल या दरम्यानच्या स्व. राजा मंत्री पथालगतची नदीपात्रातील अतिक्रमणे जमीनदोस्त केली गेली. यामध्ये मंगल कार्यालये, मोठी उपाहारगृहे, सभागृहे, लॉन्स आणि अन्य लहान-मोठय़ा दुकानांचा समावेश होता. या अतिक्रमणांना वीज आणि पाणीपुरवठा कसा करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी त्याची तपासणी करण्याचा आदेश पाणीपुरवठा विभागाला दिला होता. त्यानुसार व्यावसायिक मिळकतींना होणाऱ्या पाणीपुरवठय़ाची तपासणी मोहीम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत कारवाई झालेल्या ठिकाणच्या पाणीपुरवठय़ाची व्यवस्था तपासून कारवाई करण्यात आली.
राजाराम पूल ते म्हात्रे पूल या मंगल कार्यालये, उपाहारगृहे, लॉन्स, सभागृह अशा एकूण २६ व्यावसायिक मिळकतींची पाहणी करण्यात आली. यातील एका मंगल कार्यालय चालकाकडे पाण्याची २ लाख ६१ हजार रुपयांची रक्कम थकीत असल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात आली. अर्धा इंचाचे सात नळजोड, एक तीन इंचाचा नळजोड आणि पाऊण इंचाचे पाच बेकायदा नळजोड बंद करण्यात आले. विद्युत मोटारीही जप्त करण्यात आल्या. काही ठिकाणी विंधणविहिरीद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.