scorecardresearch

महापालिकांवर कारवाई; उजनी धरणातील प्रदूषण; पुणे महापालिकेचे १५ कोटी गोठवले

उजनी जलाशयात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे.

पुणे : उजनी जलाशयात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. उजनीतील पाण्यात घरगुती सांडपाण्याशी निगडित घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळून येत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेचे १५ कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.

विधिमंडळ अधिवेशनात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘उजनी जलाशयात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब अंशत: खरी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने उजनीतील पाण्याची गुणवत्ता वेळोवेळी तपासली जाते. त्यानुसार उजनी धरणातील पाण्यात रासायनिक पदार्थ आढळून येत नाही. मात्र, या पाण्यात घरगुती सांडपाण्याशी निगडित (टोटल कॉलिफॉर्म व फिकल कॉलिफॉर्म) घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहेत. मुळा-मुठा नदी व त्यांच्या उपनद्यांच्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा, १९७४ कलम-४१ अन्वये पुणे महापालिकेची १५ कोटी इतकी रक्कम गोठविण्यात आली आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.’

दरम्यान, याच विषयाला अनुषंगून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अप्रक्रियाकृत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मैला शुद्धीकरण प्रक्रिया संयंत्रणा उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला सन २०१९, सन २०२० आणि सन २०२१ रोजी आदेश दिले आहेत. महापालिकेविरुद्ध जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा, १९७४ अन्वये फौजदारी खटला आणि न्यायालयात दावा दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

जलप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

पुण्यालगतच्या धरण साखळी प्रकल्पांमधून सोडलेले पाणी उजनी धरणात अडविले जाते. पुण्यालगतचे शहरीकरण, औद्योगिकीरणाचे सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी पावसाळय़ात भीमापात्रात सोडून देण्यात येते. उजनी धरण व उजनी जलाशयाचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे. उजनीच्या पाण्यावर हिरव्या गर्द रंगाचा तवंग दिसून येत असल्याने या दूषित पाण्याचा मोठा फटका उजनीलगतच्या शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे उजनीवर अवलंबून असलेला सोलापूर जिल्ह्यातील नागरिक, धरणांमधील जलचरांना धोका निर्माण झाला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action against municipal corporations pollution ujani dam frozen pune municipal corporation ysh

ताज्या बातम्या