चौकातील सिग्नलवर पोलीस नसताना सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे.. पण आता चौकात पोलीस नसला तरी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकांना महागात पडणार आहे. कारण, शहरातील सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलीस लक्ष ठेवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे क्रमांक नोंदवून घेत आहेत. त्यांना दंडाची पावती घरी पाठविली जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी गुरुवारपासून शहरातील काही सिग्नलवर हा उपक्रम सुरू केला आहे. पहिल्या दिवशी पन्नासपेक्षा जास्त वाहनचालक नियमांचे उल्लघन करताना आढळले आहेत. हा उपक्रम लवकरच शहरातील सर्व सिग्नलवर सुरू केला जाणार आहे.
शहरातील सध्या चारशेपेक्षा जास्त चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या शहरातील काही चौकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे, सिग्नल तोडणे, लेन कटिंग, ट्रीपल सीट, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, मोबाईलवर बोलणे अशा प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे भंग करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्हीच्या नियंत्रण कक्षातील वाहतूक शाखेचे प्रशिक्षित पोलीस कर्मचारी नियमभंग करणाऱ्या वाहनांचे निरीक्षण करून त्यांचे क्रमांक नोंदवून घेत आहेत. नियमभंग केलेल्या वाहनांचा क्रमांक मिळाल्यानंतर वाहतूक शाखेकडे असलेल्या सॉफ्टवेअरमधून वाहनांच्या क्रमांकावरून वाहनचालकाचे नाव व पत्ता शोधून काढला जात आहे. त्या पत्त्यावर चलन पाठवून वाहतूक शाखेकडून या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले की, शहरातील सध्या काही महत्त्वाचे चौक घेऊन त्या चौकावर पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून राहतात. या चौकात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आलेले क्रमांक नोंदविले जातात. त्या क्रमांकावरून वाहनचालकाचे नाव व पत्ता शोधून त्यांना चलन पाठविण्यात येत आहे. सध्या हे काम कर्मचारी करीत असून या कामासाठी खास एक सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सुरू आहे. ते तयार झाल्यानंतर लवकरच त्यावरून सर्व शहरातील चौकात सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. पहिल्या दिवशी वाहतुकीचे उल्लंघन करताना सीसीटीव्हीत पन्नासपेक्षा जास्त वाहनचालक आढळून आले आहेत. त्यांना चलन पाठविण्याचे काम सुरू आहे. तरी नागरिकांनी शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आवाड यांनी केले आहे.