scorecardresearch

अपशब्द वापरल्यामुळे ‘एमपीएससी’कडून कारवाई

अपशब्द वापरल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) एका उमेदवारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

पुणे : अपशब्द वापरल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) एका उमेदवारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. मात्र एमपीएससीने केलेल्या कारवाईबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. एमपीएससीच्या परीक्षा, निकाल, निर्णयांबाबत उमेदवारांना माहिती देण्यासाठी एमपीएससीकडून काही महिन्यांपूर्वी ट्विटर खाते सुरू करण्यात आले. मात्र काही उमेदवार, व्यक्तींकडून समाजमाध्यमांमध्ये अपशब्द वापरले जात असल्याबाबत, गैरवर्तन करण्यात येत असल्याने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र एमपीएससीने त्या पुढे जाऊन प्रत्यक्ष कारवाई केली आहे. आयोगाबद्दल अपशब्द वापरून शिवीगाळ केल्यामुळे श्री विठ्ठल चव्हाण या नावाने खाते असलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमपीएससीने ट्विटरद्वारे दिली.

समाजमाध्यमांत चर्चा…

या कारवाईबाबत समाजमाध्यमांत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई करणे योग्य असल्याचे मत काहींनी मांडले आहे. तर एमपीएससीचे निर्णय आणि प्रक्रियेतील त्रुटींमुळे उमेदवार त्रस्त झाले असून, त्याबाबत आयोगाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे, प्रक्रिया गतिमान करणे आवश्यक असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action mpsc using abusive language ysh