मुलांच्या परीक्षा संपल्या. सुटी सुरू झाली. आता धम्माल करायची, खूप भटकायचे, निसर्गात रमायचे. निसर्गाच्या सहवासानी त्याबद्दल प्रेम, आदर, कुतूहल, जिज्ञासा निर्माण होते अन् त्यातूनच खूप काही शिकायला मिळते. हे सर्जनशील शिक्षण, इथे ‘तीन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू’. वेगवेगळ्या वयाच्या मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम परसबागेत राबवता येतात. गेल्या वर्षी माझ्या गच्चीवर भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राची छोटी मुले, उन्हाळी शिबिरात ‘भाजी डे’ साठी झाडांवर लागलेल्या भाज्या बघण्यासाठी आली अन् झाडावर लागलेली वांगी, टोमॅटो, मोठा लाल भोपळा पाहून खूश झाली. मिरचीच्या झाडावरची पांढरी फुले, हिरव्या मिरच्या अन् पिकलेल्या लालचुटूक मिरच्या पाहून अचंबित झाली. काही शूर मुलांनी हातात गांडुळे घेतली, तर काहींनी ओंजळीत गप्पी मासे धरले. काही मुलांनी पालक, शेपू तोडून कच्चाच खाल्ला. हा आनंद, ही धमाल, मुलं विसरत नाहीत. हे निसर्गसंस्कार मुलांमध्ये निसर्गाप्रति स्नेह निर्माण करतो.

मोठय़ा मुलांना परसबागेतील वृक्ष-वेलींची नावे माहीत करून द्यावीत. त्यासाठी तज्ज्ञांना बोलावून वृक्ष परिचय करून घ्यावा. मुलांना झाडाच्या नावाच्या पाटय़ा करायला सांगून त्या झाडाजवळ लावाव्यात. प्रत्येक राज्याचा राज्यवृक्ष असतो. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे ‘तामण’. मुलांना सगळ्या राज्याच्या वृक्षांची नावे सांगून फोटो दाखवावेत. झाडांचे आकार, पानाचे प्रकार, फुले, फळे, झाडांची खोडं याबद्दल वैशिष्टय़पूर्ण माहिती मुलांनी गोळा केली तर झाडे ओळखण्यात मुले तरबेज होतील. आपल्या अवती-भवतीच्या निसर्ग जाणव्यात खूप मजा असते.

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

परसबागेतील वेगवेगळ्या वेलींची माहितीसुद्धा मनोरंजक असते. वेली आधार कशा शोधतात, आधाराच्या दिशेने कशा वाढतात ते जरूर पाहावे. आधार लांब असल्यास त्या दिशेने अथवा उंच सरळ वाढण्यासाठी वेलींच्या नाजूक फांद्या एकमेकांभोवती पीळ देऊन हळूहळू वर वाढतात. हा जणू जिवंत दोरखंडच. एकमेकांभोवती पीळ दिल्याने त्याची ताकद वाढते. आपण ‘दोरखंड’ बनवण्यासाठी वेलींकडूनच प्रेरणा घेतली असणार! काही वेलींना आधाराचे ताण टेंड्रिल असतात, तर काही वेली पाने वळवून त्याचेच हूक बनवतात. मुलांना फळभाज्यांच्या वेलींची फुले पाहता येतात. दुधी भोपळा, तोंडलीची फु ले पांढरी असतात. दोडका, घोसाळे यांची फुले पिवळी असतात, लाल भोपळ्याची फुले पिवळट, केशरी असतात. सकाळच्या वेळी या फुलांवर खूप कीटक, मधमाश्या भेट देतात. कार्ल फ्रिश या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने एकोणसत्तर वर्षे मधमाश्यांवर संसोधन केले. एक मधमाशी दुसऱ्या मधमाशीला कुठल्या फुलावरून मध आणते सांगताना इंग्रजी आठ आकडय़ाच्या आकारात नाच करते. ‘विगल डान्स’ करते असे त्यांनी सिद्ध केले. मधमाश्यांना रंगाचे, वासाचे, पृथ्वीच्या चुंबकत्वीय तत्त्वाचे ज्ञान असते, हे त्याने अभ्यासले. मधमाश्या इतक्या हुशार असतात हे आपल्या मुलांना कळायला हवे. कार्ल फ्रिश यांना या संशोधनासाठी एकोणीसशे त्र्याहत्तर साली नोबेलने गौरवण्यात आले.

फुलांप्रमाणे फळांच्या माध्यमातूनही मुलांचे ज्ञान वाढवता येते. स्ट्रॉबेरी लाल का? जांभूळ जांभळे का? संत्रे केशरी का? तर त्यातील वेगवेगळ्या रासायनिक घटकांमुळे फळांना लाल रंग लायकोपीनमुळे, तर जांभळा, निळा अ‍ॅन्योसायनीनमुळे, पिवळा व केसरी केरोटिनॉइडमुळे मिळते. हे इंद्रधनुषी रंग आपल्या आहारात आरोग्यात महत्त्वाचे असतात, हे सहज समजते. वेगवेगळ्या रंगांच्या फळांची यादी करा, त्यांचे वर्गीकरण करा, जोडय़ा लावा; अशा खेळांमधून मुले हसत खेळत शिकत जातील.

आजूबाजूच्या हिरव्या कोपऱ्यांचे निरीक्षण केल्यास मुलांना दिसेल फुलांपासून फळे तयार होतात. फळे पक्व होऊन लक्षावधी बिया निसर्गात उधळल्या जातात. बीजप्रसार हा विषय अभ्यासक्रमात असतो. त्याचे शिक्षण निसर्गातून मिळेल. शेवरीच्या म्हाताऱ्या, बहाव्याच्या शेंगांचा दांडीया, शिरिषाच्या शेंगांचे खुळखुळे मुलांना बघू द्या. वेगवेगळे पक्षी, त्यांची घरटी, निसर्गातली अन्नसाखळी पाहू द्या. मुलांना अतिशय आवडणारा विषय म्हणजे फुलपाखरे; कॉमन यलो, जॅझेबेल, इमिग्रंट, टायगर, पेन्सी, सेलर अशा फुलपाखरांशी त्यांची ओळख करून द्या. केहीमकर, कृष्णमेघ कुंटे यांची फुलपाखरांवरची सुंदर पुस्तके आणा. गेल्या ऑक्टोबरमध्ये माझ्या लिलीच्या पानांवर काळ्या मखमली, पांढऱ्या, केसरी ठिपक्याच्या आळ्या आल्या अन् त्यांनी पाने फस्त केली अन् गायब झाल्या. त्यांचे कोश होऊन फुलपाखरे झाली असतील अन् इकडे लिलीला पाने फुटून ती ताजीतवानी झाली अन् आता फुलांचे गुच्छ आलेत. निसर्गातील या सहजीवनातून मूल्यशिक्षणही मिळते.

बागेतून आपल्याला जीवशास्त्र, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, डिझाईन असे अनेक विषय शिकता येतात, म्हणूनच ही परसबाग नव्हे तर सायन्सची लॅब आहे. सुटीत परसबागेत हसत खेळत मुलांना विज्ञान अनुभवू द्या.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)