पुणे : ‘संगीत श्रवणातून कान तयार होत असतो. त्याप्रमाणे विनोदी लेखनामध्ये विसंगती टिपण्याची दृष्टी महत्त्वाची असते,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. जयवंत दळवी म्हणजेच ठणठणपाळ यांच्या मिश्कील लेखनाचा माझ्या लेखनावर प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. अक्षरधारा बुक गॅलरीच्या ‘अभिजात मराठी शब्दोत्सवा’मध्ये राजहंस प्रकाशनच्या वतीने दिलीप प्रभावळकरलिखित ‘हरवलेल्या ट्राॅफीची गोष्ट आणि इतर कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने लेखिका-अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी प्रभावळकर यांची मुलाखत घेतली. त्याप्रसंगी प्रभावळकर बोलत होते. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डाॅ. सदानंद बोरसे, मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या डाॅ. कल्याणी मांडके आणि अक्षरधारा बुक गॅलरीच्या रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या.
‘संपादकांनी माझ्यातील लेखक आणि दिग्दर्शकांनी माझ्यातील अभनेत्याला घडविले’, असे सांगून प्रभावळकर म्हणाले, “लोकसत्ता’च्या ‘अनुदिनी’ या सदरासाठी काल्पनिक टिपरे कुटुंबाची कथा मांडताना केलेल्या लेखनातून मी एकाचवेळी पाच व्यक्तिरेखा जगत होतो. पुढे त्याची ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका लोकप्रिय झाली. ‘एकच षटकार’मध्ये संदीप पाटील आणि निखिल वागळे यांनी मला लिहायला प्रोत्साहन दिले. ’बोक्या सातबंडे’ या नभोनाट्याच्या माजगावकर यांच्या सूचनेनुसार कथा झाल्या. आता त्याची २५ वी आवृत्ती सुरू आहे.’
ग्रंथखुणा ठेवून एकावेळी दिवसात मी पाच पुस्तके वाचत असतो. वाचन करावेसे वाटते. पण, अन्य व्यापामुळे खूप वाचन करू शकत नाही ही खंत आहे. जयवंत दळवी यांच्या ठणठणपाळ मिश्किल विनोदाचा माझ्यावर प्रभाव आहे असे वाटते. महाविद्यालयीन दशेतील एकांकिकेच्या वेळी पॅन्ट चोरीला गेल्याच्या फजितीवर केलेले लेखन ही सुरुवात झाली.
‘वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळाल्याने कोणत्याही साच्यामध्ये अडकलो नाही. अनेक नायिका इच्छुक असताना ‘अलबत्या गलबत्या’तील चेटकीण मी करावी हे रत्नाकर मतकरी यांनी सुचविले आणि त्यांनी माझ्याकडून भूमिका करून घेतली. ‘साळसूद’ मालिकेतील खलनायक, ‘पोस्टकार्ड’ चित्रपटातील निरक्षर लाकूडतोड्या, ‘कवडसे’ चित्रपटातील दुराचारी मामा अशा मला आवडलेल्या भूमिका काहीशा दुर्लक्षित राहिल्या,’ असे सांगून प्रभावळकर म्हणाले, ‘ मी हिंदी चित्रपट जेमतेम १५ केले असतील. पण, अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शहा, परेश रावळ, ओम पुरी, संजय दत्त यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सई परांजपे (बिकट वाट वहिवाट), सुमित्रा भावे (दिठी) यांच्याबरोबर एकदाच काम केले. नाटक आणि चित्रपटांमध्ये तांत्रिक प्रगती झाली आहे. तांत्रिक बाजू हे साधन असावे. साध्य नसावे. सजावट ही मूर्तीपेक्षा महत्त्वाची असू नये. मुळात अभिनय महत्त्वाचा आहे.’
‘दशावतार’ चित्रपटातील भूमिका पाहून ‘या वयातसुद्धा’ ही ‘टॅगलाईन’ का झाली हे समजत नाही. वय वाढले हे काही माझे कर्तृत्व नाही. ‘या वयातसुद्धा’ असे म्हणताना माझ्याविषयी दया, करुणा, सहानुभूती असते की कौतुक किंवा आदर, हे कोडे काही उलगडत नाही. – दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते-लेखक
