पुणे : वाहतूक शाखेतील ३० ‘ड्युटी’ अंमलदारांच्या (डीओ) बदल्या करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिले. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करण्याची जबाबदारी ‘ड्युटी’ अंमलदारांवर सोपविण्यात आली होती. त्यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर एकाच वेळी तीस जणांच्या बदल्या करण्यात आल्या.
बदल्या करण्यात आलेल्यांची लष्कर आणि बंडगार्डन वाहतूक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश दिले. पोलीस ठाण्यांप्रमाणे वाहतूक शाखेची रचना आहे. पुणे शहरात ३० वाहतूक विभाग कार्यरत आहेत. या विभागाचे कामकाज ‘ड्युटी’ अंमलदारांवर सोपविण्यात आले आहे. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज, महत्त्वाच्या व्यक्तींचे बंदोबस्त, खटले असे कामकाज सोपविण्यात येते.
वाहतूक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना कामकाज कसे करावे, वाहतूक नियंत्रण, नागरिकांशी संवाद याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील सर्व वाहतूक विभागातील ‘ड्यूटी’ अंमलदारांच्या बदल्या हा नवीन कार्यपद्धतीचा भाग आहे. वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षकांवर ‘ड्यूटी’ अंमलदारांवर अवलंबून राहावे लागत होते, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.