पिंपरी : चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरिअल रुग्णालयात अंडाशयाच्या कर्करोगावर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कमीत कमी चिरफाड करून दा विंची रोबोटिक सायटोरिडक्टिव्ह या शस्त्रक्रियेद्वारे महिलेच्या पोटातील गाठ बाहेर काढण्यात आली. बारा तासांत ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून, पाचव्या दिवशी महिलेला घरी सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एका ५१ वर्षांच्या महिलेला अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. तिच्या पोटात, ओटीपोटात आणि फुफ्फुसाच्या आवरणापर्यंत कर्करोग पसरला होता. ही महिला आदित्य बिर्ला मेमोरिअल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. महिलेला तीन वेळा औषध देण्यात आले. उपचारांनंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. पोटाच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि दिसणारी गाठ काढण्यासाठी रोबोटिक साहाय्य घेतले. यानंतर एचआयपीईसी प्रक्रिया करण्यात आली. ४२ अंश सेल्सिअस तापमानाला गरम केलेले सिस्प्लेटिन औषध ९० मिनिटांसाठी पोटाच्या पोकळीत फिरविण्यात आले. ही शस्त्रक्रिया १२ तास चालली. ओपन सर्जरीचा अवलंब न करता ही शस्त्रक्रिया केल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रशांत चंद्रा म्हणाले, ‘या शस्त्रक्रियेमध्ये गुंतागुंत केवळ कर्करोगाच्या प्रसारापुरती मर्यादित नव्हती, तर किमान छिद्र पाडून गाठ पूर्णपणे काढून टाकण्याची आवश्यकता होती. ओपन सर्जरीचा अवलंब न करता ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. तंत्रज्ञानाच्या जोडीने कर्करोगाच्या गुंतागुंतीच्या उपचारांमधील शक्यता अधिक वाढू शकतात. रोबोटिक सर्जन डॉ. निखिल परवते, डॉ. निखिल जिल्लावार, डॉ. तानाजी म्हात्रे, डॉ. उर्वी शुक्ला, डॉ. गिरीश कुमठेकर, डॉ. विप्लव वैद्य यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली.