पुणे : ‘देशात आणि राज्यात हुकुमशाही पद्धतीने आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना देशविरोधी, ‘अर्बन नक्षल’ ठरवले जाते. खासगी आणि सरकारी क्षेत्रात पुरेशा नोकऱ्या नाहीत. उद्योगधंदे बंद पडत आहेत किंवा इतर राज्यांत जात आहेत. रोजगाराच्या प्रश्नाचे गांभीर्य आणखी वाढणार आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठीही लढा उभारण्याची गरज आहे,’ अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली.

‘एमपीएससी’ भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एस. एम. जोशी पूल येथे आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, खासदार संजय सिंह, अमोल कोल्हे, भास्कर भगरे, आमदार जयंत पाटील, रोहित पाटील, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, रोहिणी खडसे, अभिनेते किरण माने आदीनी आंदोलनस्थळी भेट आंदोलनाला पाठिंबा दिला. पवार यांनी विद्यार्थ्यांसह सरकारच्या ध्येयधोरणांच्या विरोधात तिरडी आंदोलन केले.

ठाकरे म्हणाले, ‘निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार ही सगळी प्यादी आहेत. त्यांच्या मागे असलेल्या मोठ्या नेत्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. पेपर, निवडणूक, कंपन्या आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. कोणत्याही पक्षाचे किंवा विचारांचे असा, निवडणुकीत कोणालाही मतदान करा; मात्र आंदोलनातील एकजूट कमी होऊ देऊ नका. ‘एमपीएससी’चे अध्यक्ष भीमनवार यांचा २४ तासांत राजीनामा न झाल्यास विद्यार्थ्यांनी मुंबईत यावे, ‘एमपीएससी’च्या कार्यालयाच्या दारात आंदोलन करून भीमनवार यांचा राजीनामा घेऊ.’

‘आम्ही सत्तेत असताना कधी पेपर फुटले नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांतील परिस्थिती पहिल्यास व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. राज्य सरकारने हा कारभार पारदर्शी करावा. चौकशीसाठी एसआयटी नेमणूक करून पारदर्शी कारभार करावा. राज्यकर्त्यांनी शहाणे व्हावे, तर राज्य अधिक काळ टिकेल,’ असे जयंत पाटील यांनी नमूद केले.

‘सरकारची मस्ती उतरवावी’

‘चोरांच्या सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे काम महाराष्ट्रातील तुम्ही तरुण करू शकता. आंदोलन जोरदारपणे सुरू ठेवून राज्य सरकारची मस्ती उतरवावी,’ अशी भूमिका खासदार संजय सिंह यांनी मांडली.