पुणे : ‘सत्तेच्या हव्यासापोटी आणि दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी विरोधी पक्ष फोडणे, चिन्हे आणि नावे चोरणे हा भारतीय जनता पक्षाचा गलिच्छ डाव आहे, असा आरोप करत शिवसेनेचे (ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी पक्षासोबत असणाऱ्यांवर नेहमीच विश्वास दाखविला आहे. जे मशालीच्या चिन्हावर आणि जनतेच्या विश्वासाने निवडून आले आहेत, ते सर्व आमच्यासोबत आहेत. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये,अशी प्रतिक्रियाही आदित्य यांनी पाच खासदार फुटणार असल्याच्या शक्यतेवर दिली.
शिवसेनेचे (ठाकरे) पाच खासदार उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते (शिंदे) एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेच्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी खासदार फुटण्याच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली. ‘न्यायालयाकडून वेळेत न्याय न मिळणे म्हणजेच, न्याय नाकारण्यासारखे आहे आणि त्यामुळेच लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपचे हे गलिच्छ राजकारण केवळ पक्षांना नव्हे, तर देशाच्या संविधानाला घातक ठरत आहे, अशी टीकाही आदित्य यांनी केली.
ते म्हणाले, ‘ तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी वेगळा गट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही सगळी अहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दीदींच्या नावावर आणि पश्चिम बंगालमध्ये सरकार बदलल्यानंतर त्यांनी उड्या मारण्यास सुरुवात केली. राज्यात शिवसेनेचा खटला जवळपास आता चार-साडेचार वर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही खटला सुरू आहे. मात्र, एखादा पक्ष असा फुटला जातो. पक्षाचे नाव चोरले जाते आणि निवडणूक आयोग त्यांना निवडणूक चिन्ह (सिम्बाॅल) देते, ही खूप मोठी गोष्ट आहे. जगात मोठी असलेली देशातील लोकशाही या प्रकारामुळे नष्ट होत आहे, त्यावर विचार करावा लागणार आहे.’
शिवसेनेचे सात खासदार संपर्कात असल्याच्या कृपाल तुमाने यांच्या दाव्यावर आदित्य ठाकरे यांनी खरपुस समाचार घेतला. त्यावेळी लोकसभेला ते कसे जिंकले, कसा आम्ही प्रचार केला त्यामध्ये मला पडायचे नाही. कृपाल तुमाने यांनी पुन्हा निवडणूक लढवावा आणि जिंकून दाखवावे, असे आव्हानही आदित्य यांनी दिले.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पक्षाबरोबर असणाऱ्या सर्वांच नेहमीच विश्वास दर्शविला आहे. जे मशालीच्या चिन्हावर जनतेच्या विश्वासाने निवडून आले आहेत, ते सर्व आमच्यासोबत घट्ट उभे आहेत. ओमराजे निंबाळकर असोत की इतर लोकप्रतिनिधी, कौटुंबिक अडचणींमुळे काही जण बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी ते आमच्या संपर्कात होते. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव साहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच जनतेने मशालीला कौल दिला आहे आणि हा विश्वास कधीही तुटणार नाही, असेही आदित्य यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती
महाविकास आघाडी सरकारने सन २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांना सन्मानाने कर्जमुक्त केले होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, तो गुन्हेगार नाही, त्यामुळे त्याच्यावर उपकार केल्यासारखी क्लिष्ट अटींची कर्जमाफी देणे ही त्यांची थट्टा आहे. महाविकास आघाडीच्या काळात कोणतीही तांत्रिक अट न लावता शेतकऱ्यांना थेट दोन लाखांपर्यंत कर्जमुक्त केले गेले होते. सध्याचे सरकार केवळ थातूरमातूर घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.
लाडकी बहीण योजना मतांसाठीची फसवणूक
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या सरकारने लाडकी बहीण योजनेची टिमकी वाजवली आणि राज्यातील महिलांची मते घेतली. लाडकी बहीण योजनेचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून, निवडणुका संपताच आता त्याच महिलांना अपात्र ठरवण्याचा, घाट या सरकारने घातला आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे केवळ मतांसाठी केलेली शुद्ध फसवणूक आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
