पुणे जिल्ह्य़ातील एकवीस मतदार संघांची मतमोजणी रविवारी सकाळपासून होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीसाठी दोन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पाच मतदार संघांची मतमोजणी बालेवाडी येथे तर सहा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळ या ठिकाणी होणार आहे, तर दहा मतदार संघांची मतमोजणी त्या तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
बालेवाडी येथे पिंपरी, चिंचवड, भोसरी, कोथरूड आणि खडकवासला या मतदार संघांची तर कोरेगाव पार्क येथे कसबा, शिवाजीनगर, वडगावशेरी, पर्वती, हडपसर आणि पुणे कॅन्टोमेन्ट या मतदार संघांची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक फेरीनिहाय मतदानाची आकडेवारी निरीक्षकांनी मान्य केल्यानंतरच जाहीर केली जाणार आहे. जिल्ह्य़ातील प्रत्येक मतदार संघाच्या मोजणीसाठी वीस टेबलची रचना करण्यात आली आहे. मात्र, पुरंदर अठरा आणि भोर मतदार संघासाठी अठ्ठावीस टेबलची निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार रचना करण्यात आली आहे. मतमोजणी गतिमान होण्याबरोबरच अचूकता असावी, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मतमोजणी पाहण्यासाठी सार्क देशाच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ आले आहे. ते उद्या मतमोजणीतील पारदर्शकता, अचूकता याची पाहणी करणार आहेत, असे राव यांनी सांगितले.
सहा हजार टपाली मतपत्रिका प्राप्त
 टपाली मतमोजणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सहा हजार टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या मतदान पत्रिका स्वीकारल्या जाणार आहेत. दहा हजार टपाली मतपत्रिका प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे, असे जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले.