scorecardresearch

उसाबाबत धोरणकर्तेच संभ्रमात

यंदा हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात शिल्लक उसाचे गाळप करण्याचे मोठे आव्हान साखर कारखान्यांपुढे निर्माण झाले आहे.

दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : राज्यात शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर होत आहे. साखर आयुक्तालय आपल्या परीने ऊस तोडणीचे नियोजन करीत आहे. शेतकरी संघटना, भाजप प्रणीत किसान मोर्चासह अन्य नेते शिल्लक ऊस तोडणीसाठी दबाव वाढवीत आहेत. दुसरीकडे शुक्रवारी पुण्यात झालेल्या खरीप आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार ऊस प्रश्नावरून संभ्रमात असल्याचे दिसून आले. एकूण प्रशासन, राजकीय नेते आणि साखर कारखानदार असे सर्वजण ऊस प्रश्नावरून संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

यंदा हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात शिल्लक उसाचे गाळप करण्याचे मोठे आव्हान साखर कारखान्यांपुढे निर्माण झाले आहे. आजअखेर सुमारे ४० – ५०  लाख टन ऊस शिल्लक असल्याचा दावा विविध शेतकरी संघटना करीत आहेत. मात्र, साखर आयुक्त कार्यालय फक्त २५ लाख टन ऊस शिल्लक असल्याचे सांगत आहे. २ मेअखेर राज्यात १११ कारखाने सुरू आहेत.

राज्यातील कारखान्यांनी एप्रिलअखेर १३३३ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. मराठवाडा विभागात शिल्लक उसाचा प्रश्न अधिक गंभीर झाल्याचा आरोप शेतकरी संघटना करीत आहेत. राज्यात आजअखेर सुमारे ४० लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यात मराठवाडय़ातील सर्वाधिक सुमारे ३० लाख टन उसाचा समावेश आहे.

शिल्लक ऊस नेमका किती?

भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने  साखर आयुक्तालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. या निवेदनात राज्यात ५० लाख टन ऊस शिल्लक असल्याचा दावा केला आहे. खासदार उदयनराजे भोसले फक्त साताऱ्यात ५०० एकरावरील ऊस शिल्लक असल्याचे सांगत आहेत. स्वाभिमानीचे नेते कालिदास आपेट फक्त मराठवाडय़ातच ४० लाख टन ऊस शिल्लक असल्याचा दावा करीत आहेत. राजू शेट्टी शिल्लक उसाचा नेमका आकडा सांगता येणार नाही, असे म्हणत आहेत. त्यामुळे राज्यात नेमका किती ऊस शिल्लक आहे, या बाबत संभ्रम आहे.

उसाला पाणी जास्त लागते. शिल्लक उसाचा प्रश्नही आहे, त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी करून सोयाबीनचे क्षेत्र वाढवा, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, लगेचच ऊस शेतकऱ्यांना शाश्वत, चांगले पैसे देणारे पीक आहे. इथेनॉल कारखाने काढले पाहिजेत, असेही ते म्हणाले. त्यामुळे उसाचा प्रश्न नेमका कसा हाताळायचा, या बाबतच संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

साखर आयुक्तालयाने ऊस तोडणीचे चांगले नियोजन केले आहे. आता फक्त मराठवाडय़ातच ऊस शिल्लक आहे, १४० हार्वेस्टर तोडणी करीत आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत ५ मेअखेर २३० लाख टन उसाचे अधिक गाळप केले आहे. सुमारे २५ लाख टन ऊस शिल्लक आहे.

शेखर गायकवाड, साखर आयुक्त

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Administration political leaders and sugar factory owner confused about the sugarcane issue zws

ताज्या बातम्या