पुणे : राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीच्या प्रवेशाची पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे. पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण, नाशिक, अमरावती, नागपूर या क्षेत्रातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी शिक्षण विभागाने मे महिन्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरला आहे. मात्र राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून जवळपास पंधरा दिवस झाले तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे.

या पार्श्वभूमीवर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार यंदा प्रथमच राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या आधी जाहीर केला. आयजीसीएसई आणि एनआयओएस वगळता अन्य शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. दरवर्षी अकरावीच्या राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी पाच टक्के विद्यार्थी सीबीएसईचे असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आबे. सीबीएसईचा निकाल जाहीर होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिक सुविधा तपासून अधिकतम प्रवेश क्षमता ठरवण्याचे कामकाज शिक्षण उपसंचालक स्तरावरून सुरू आहे. त्यामुळे अपुऱ्या सुविधा आणि भरमसाठ प्रवेश अशी परिस्थिती टाळण्यास मदत होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज भाग एक भरून त्याची पडताळणी करून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलीआहे. प्रवेश फेरीचे वेळापत्रक आणि प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाइन प्रवेश नसलेल्या भागात अकरावीचे प्रवेश सुरू

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू झालेला नसला, तरी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नसलेल्या ग्रामीण भागातील अकरावीचे प्रवेश सुरू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक आणि प्रवेश फेरी जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे मिळवून ठेवावी. प्रवेशासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. अकरावी प्रवेश लवकर होऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.