आरटीईअंतर्गत प्रवेश आता ३० सप्टेंबरपर्यंतच

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सलग दोन वर्षे जानेवारीपर्यंत सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि उपस्थितीबाबत समस्या निर्माण होत असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे.

जागा रिक्त राहिल्या तरी प्रवेश बंद

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सलग दोन वर्षे जानेवारीपर्यंत सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि उपस्थितीबाबत समस्या निर्माण होत असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. परिणामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, ३० सप्टेंबरनंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी परिपत्रकाद्वारे या संदर्भातील सूचना दिल्या आहेत.  २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी एकाच टप्प्यात प्रवेशासाठीची सोडत काढण्यात येईल. तसेच शाळेत प्रवेशासाठीची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा लघुसंदेश पाठवला जाईल. पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र प्रतीक्षा यादीत नाव असण्याचा अर्थ प्रवेश निश्चित होईल असा नाही. काही स्वयंसेवी संस्था पालकांना अर्ज भरून देताना विद्याथ्र्याच्या निवासाचे स्थान जाणीवपूर्वक शाळेच्या जवळ दाखवतात किंवा चुकीचे भरतात. अशा संस्थांबाबत तक्रार दाखल झाल्यास त्या संस्थांबाबत कायदेशीर कारवाई करावी. पडताळणी समितीने पत्त्याबाबतची खात्री करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  चालू वर्षापासून शाळांची नवीन नोंदणी करताना नव्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांत तीन वर्षांपर्यंत आरटीईचे प्रवेश देऊ नयेत. संबंधित शाळांची गुणवत्ता आणि सर्वसाधारण प्रवेश तपासून निर्णय घ्यावा. आरटीईची २५ टक्के राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या शाळांच्या नोंदणीची शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. ज्या शाळा पात्र असूनही नोंदणी न करणाऱ्या किंवा २५ टक्के जागा उपलब्ध करून न देणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शाळांची नोंदणी रखडल्याने…

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. आरटीई प्रवेशांची शाळा नोंदणीची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करायची होती. मात्र अद्याप शाळांची नोंदणी पूर्ण झालेली नाही. शाळांची नोंदणी झाल्याशिवाय प्रवेशांच्या जागांची निश्चिती केली जात नाही. वेळापत्रकानुसार आरटीईअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण करून पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीची मुदत देण्याचे, प्रवेशांची सोडत ८ किंवा ९ मार्चला काढण्याचे नियोजन होते. गेल्या काही दिवसांत आरटीई प्रवेश प्रक्रियेशी संबंधित काही अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित झाल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या. मात्र शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत शाळांची नोंदणी पूर्ण करण्यात येईल. तसेच प्रवेश प्रक्रिया मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Admission rte september students ysh

Next Story
पुणे : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुचा अल्पवयीन मुलीवर हातोड्याने हल्ला
फोटो गॅलरी