शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत १९ ते २७ मे दरम्यान पुणे जिल्हा वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी केंद्रावर कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरटीईअंतर्गत यंदा ९ हजार ८६ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९०६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी आलेल्या २ लाख ८२ हजार ७८३ अर्जांतून ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी ६२ हजार ८४८ जागा अद्याप रिक्त असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे रिक्त जागांवर प्रवेश मिळण्याबाबतच्या सूचनांची प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी बुधवारी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतचे परिपत्रक परिपत्रक प्रसिद्ध केले.

प्रवेश प्रक्रियेत पुणे जिल्हा वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागांवर आता १९ मेपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यासाठी प्रतीक्षा यादीतील पालकांनी लघुसंदेशावर अवलंबून न राहता संकेतस्थळावरील लॉगीनमधून ॲलॉटमेंट लेटरची प्रत घ्यावी, तसेच आवश्यक कागदपत्रांसह १९ मे ते २७ मे या कालावधीत पडताळणी केंद्रावरील समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा, प्रवेश निश्चित झाल्याची पावती शाळेत घेऊन जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.