scorecardresearch

आगाऊ हवामानाचा अंदाज, योग्य नियोजनामुळे यंदा पुणे शहरात पूरस्थिती नाही

धरणांमधून मर्यादित पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी शहरातील नदीपात्रालगतच्या नागरी भागात पाणी शिरण्याच्या तुरळक घटना वगळता मोठी हानी यंदा झालेली नाही.

आगाऊ हवामानाचा अंदाज, योग्य नियोजनामुळे यंदा पुणे शहरात पूरस्थिती नाही
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

पुणे : आगाऊ हवामान अंदाज आणि जलसंपदा विभागाच्या योग्य नियोजनामुळे यंदा शहर आणि परिसरात पूरस्थिती ओढवली नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरल्यानंतर खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हवामानाचा अंदाज घेऊन आधीपासूनच मुठा नदीत पाणी सोडण्यात आल्याने मुसळधार पाऊस पडूनही धरणांमधून मर्यादित पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी शहरातील नदीपात्रालगतच्या नागरी भागात पाणी शिरण्याच्या तुरळक घटना वगळता मोठी हानी यंदा झालेली नाही.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील संभाव्य पूर ठिकाणे जाहीर केली जातात. तसेच स्थानिक यंत्रणेला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येतात. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी, पुलाची वाडी, पाटील इस्टेट, येरवड्यातील शांतीनगर आणि इंदिरानगर, संगमवाडी, लोणीकाळभोर, चांदे, वाकड, औंध, दापोडी, सांगवी, बाणेर, हिंगणगाव, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळेसौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, चोवीसवाडी, निरगुडे, सांगवी या ठिकाणी धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यास पूरस्थिती येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात शहर व परिसरात यंदा तशी परिस्थिती अपवाद वगळता आलेली नाही.

हेही वाचा : चांदणी चौक पूल : बांधण्याचा खर्च २५ लाख; पाडण्याचा खर्च दीड कोटी!

याबाबत बोलताना जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले म्हणाले, की गेल्या दोन वर्षांपासून शहर व परिसरात पूरस्थिती येऊन नुकसान होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अलीकडच्या काही वर्षांत कमी वेळात जास्त पाऊस होत आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असली आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यास मोठ्या प्रमाणात धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. परिणामी नदीकाठच्या भागाला त्याचा फटका बसतो. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हवामानाचा अंदाज घेऊन आधीच धरणांमधून टप्प्याटप्प्याने नदीत पाणी सोडण्यात येते. असे केल्याने धरणांमध्ये पावसाचे अतिरिक्त पाणी साठविण्यास वाव मिळतो. परिणामी धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याची गरज राहत नाही.

हेही वाचा : पुण्यात चुलीवरचा दिवाळी फराळ; मोदी सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन

दरम्यान, यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत शहरी भागाला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. लवकरच कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन त्यामध्ये उपलब्ध पाण्याचे नियोजन केले जाणार आहे, असेही गुणाले यांनी स्पष्ट केले.

यंदाचा सर्वाधिक विसर्ग ३० हजार क्युसेक

मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर यंदाच्या हंगामात ११ जुलै रोजी खडकवासला धरण १०० टक्के भरले. तेव्हा या धरणातून मुठा नदीत १३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात २६ हजार क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी हंगामातील सर्वाधिक ३० हजार ६७७ क्युसेकचा विसर्ग नदीत करण्यात आला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या