२०२२च्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये

पुणे : राज्य शासनाकडून २०२१मधील काही पदे, संवर्गांसाठी मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत, होत आहेत. त्यानुसार शासनाकडून प्राप्त होणाऱ्या परिपूर्ण मागणीपत्रांच्या आधारे २०२१मधील स्पर्धा परीक्षांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्याचे नियोजन असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) देण्यात आली आहे. तसेच २०२२मध्ये राबवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक २०२२साठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांनुसार नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

स्पर्धा परीक्षा उमेदवार स्वप्नील लोणकर याने आत्महत्या के ल्यावर एमपीएससीतर्फे  १५ हजार ५११ पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या भरतीसाठी काही विभागांनी अद्याप मागणीपत्र सादर न के ल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध के ले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत सर्व विभागांनी तत्काळ मंजूर पदांचा आढावा घेऊन मागणीपत्र ३० सप्टेंबरपर्यंत आयोगाकडे पाठवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगामार्फ त राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियांच्या जाहिराती, स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आणि सद्यस्थितीबाबत आयोगाकडून गुरुवारी प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. 

आतापर्यंत २०२१मध्ये विविध संवर्गातील १ हजार ८० पदांसाठी एकू ण १०१ जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत अन्य काही पदे, संवर्गासाठी मागणीपत्र प्राप्त होणे अपेक्षित आहे. शासनाकडून प्राप्त परिपूर्ण मागणीपत्रानुसार तातडीने जाहिराती प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या ५ मे २०१चे आदेश आणि या संदर्भातील शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयास अनुसरून एकू ण आठ परीक्षांचे निकाल सुधारित करून जाहीर करण्यात आले आहेत. तसेच पाच परीक्षांसाठी मुलाखतीचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. आयोगाकडे विविध टप्प्यावर प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याची कार्यवाही ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.