तीव्र पाणीटंचाई आणि उपलब्ध असलेल्या पाण्याचा अपव्यय यावर उपाय शोधण्यासाठी तसेच पाणीबचत, पाण्याचा पुनर्वापर याच्या योजना आखण्यासाठी महापालिका आता सल्लागारांची नेमणूक करणार आहे. इतर अनेक कामांमध्ये पदोपदी सल्लागार कंपन्यांची नेमणूक करणाऱ्या महापालिकेने पाण्याबाबतच्या उपाययोजनांसाठीही आता सल्लागार नेमावा असा प्रस्तावच देण्यात आला असून त्यानुसार या विषयासाठीही आता सल्लागाराची नेमणूक केली जाईल.
धरणांमधील पाणीसाठा आणि पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन पुणे शहराला एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी सुरू होईल. महापालिकेत सध्या सर्व बैठकांमध्ये तसेच सभांमध्ये पाणीटंचाईच्या विषयावर चर्चा सुरू असून पाण्याची गळती, चोरी तसेच पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी प्रशासनाकडूनही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर उपमहापौर आबा बागूल यांनी गुरुवारी प्रशासनाला सल्लागार नेमण्याचा ठराव दिला असून तसे पत्रही त्यांनी आयुक्तांना दिले आहे. पुणे शहराला खडकवासला धरणातून किती पाणीपुरवठा होतो तसेच किती पाणीपुरवठा कालव्यामार्फत होतो आणि त्याचे वितरण या महत्त्वाच्या विषयाचा जमा-खर्च मांडणे आवश्यक असून हे काम सल्लागाराकडून करून घ्यावे अशी सूचना बागूल यांनी केली आहे. पाण्याचा हा जमाखर्च मांडण्याबरोबरच पाण्याचे स्रोत शोधण्याचेही काम यापुढे प्रशासनाला करावे लागणार आहे. त्या दृष्टीनेही सल्लागार नेमणे आवश्यक ठरेल. पाण्याचे नवे स्रोत शोधल्याशिवाय शहराला पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही. यासाठी हे काम हाती घ्यावे अशी बागूल यांची सूचना आहे.
महापालिकेला मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणीसाठी मंजूर करण्यात आला होता. तसा करारही झाला होता. त्याची कागदपत्रही उपलब्ध आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांत या कराराबाबत तसेच मुळशी धरणातून पाणी आणण्याबाबत महापालिकेने कोणतीही प्रक्रिया केलेली नाही. शहराला वाढीव साठा मिळण्याच्या दृष्टीने हे पाणी उपयुक्त ठरणार असूनही या विषयाकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे या विषयाला प्राधान्य देऊन आवश्यक तो सर्व पाठपुराव करून मुळशीतून पुण्याला पाणी कसे मिळवता येईल यासाठीचे कामही सल्लागाराकडून करून घ्यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. पाण्याची गळती थांबवणे हा पाणीबचतीचा महत्त्वाचा उपाय आहे. मात्र त्याबाबत फक्त चोवीस तास-सातही दिवस पाणीपुरवठा करण्याची योजना असून ती सुरू झाल्यानंतर पाण्याची गळती थांबवता येईल असे सांगितले जात आहे. ती योजना सुरू होईपर्यंत सध्याची गळती थांबवण्याच्या ठोस उपाययोजना हाती घेतल्या तर गळती थांबवणे शक्य होईल. यासाठीही सल्लागाराचा उपयोग होऊ शकतो, असे आयुक्तांना कळवण्यात आले आहे. पाण्याच्या पुनर्वापराबाबतही प्रभागनिहाय आराखडे तयार केले तर पाणी वाचवता येऊ शकते. तसेही आराखडे तयार करणे आवश्यक असल्याचे बागूल यांचे म्हणणे आहे.
संस्थांची मदत घेता येईल
सल्लागाराची नेमणूक याचा अर्थ फक्त निविदा काढून एखाद्या कंपनीची नेमणूक असा नाही, तर पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच अशा प्रकारच्या ज्या अनेक मान्यताप्राप्त संस्था आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून अशा संस्थांचीही मदत महापालिका घेऊ शकेल, असेही उपमहापौर आबा बागूल यांनी सांगितले.