आळंदी आणि देहू ते पंढरपूर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा ‘हरित भक्ती मार्ग’ करण्यात येणार असून, या मार्गावर सभागृह, पेट्रोलपंप आणि फूड मॉल विकसित केले जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
या रस्त्यांची नितीन गडकरी यांच्याकडून हवाई पाहणी करण्यात आली.गडकरी म्हणाले, ‘आळंदी आणि देहू ते पंढरपूर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा ‘पालखी रस्ता हरित भक्ती मार्ग’ करण्यात येणार आहे. या मार्गावर पालखी विसाव्याच्या ठिकाणी किमान दहा हजार लोकांच्या सोयीचे सभागृह उभारण्यात येणार आहे. एरवी लग्नकार्यासाठी आणि वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. पालखी मार्गावर पेट्रोल पंप, फूड मॉल विकसित करण्यात येणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हडपसरपासून मोहोळपर्यंत असा २३४ किमी रस्ता विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण आणि दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सासवड, निरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर या ठिकाणी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित केले आहेत. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस, बारामती, इंदापूर, अकलूज, बोंडलेपर्यंत विकसित करण्यात येत आहे. दोन्ही मार्गावरील पालखी विसाव्याच्या स्थळांवर वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तिचित्रे, अभंगवाणी या सुविधांसह सौंदर्यीकरण केले जाणार आहे, असे गडकरी म्हणाले.पालखी मार्गावर सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारची वनौषधी असतील.
पाच टप्प्यांमध्ये विकास
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यांमध्ये पुढील वर्षीच्या जानेवारीपर्यंत विकसित होत आहे. मोहोळ ते वाखरी भागाचे ९१ टक्के, वाखरी ते खुडूस भागाचे ९७ टक्के, खुडूस ते धर्मपुरी भागाचे ८८ टक्के, धर्मपुरी ते लोणंद ४८ टक्के आणि लोणंद ते दिवे घाट भागाचे २० टक्के काम झाले आहे. दिवे घाट ते हडपसर भागाच्या विकसनाचा टप्पा अद्याप निविदा प्रक्रियेमध्ये आहे. एखादा टप्पा भूमी संपादनाअभावी लांबू शकतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
पालखी मार्गावर रस्त्याच्या कडेला वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ३.२ मीटर मार्गावर लाल रंगाच्या ‘बीटूमन’ फरशांचा वापर केला जाईल. या फरशा डांबरी रस्त्याच्या तुलनेत फार गरम होत नाहीत. त्यामुळे वारकऱ्यांना पायी चालणे सुसह्य होईल. – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्री