पुणे : सध्याच्या महागाईच्या दिवसांमध्ये एक कप चहा घ्यायचा तरी खिशामध्ये किमान दहा रुपये असावे लागतात. मात्र, त्याच्याही निम्म्या किमतीमध्ये म्हणजे अवघ्या पाच रुपयांमध्ये गरजूंची आरोग्य तपासणी केली जात आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या ‘कष्टाची भाकर’ उपक्रमापासून प्रेरणा घेत पुण्यातील संस्थेच्या वतीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे.

ही सामाजिक संस्था आहे रुग्ण हक्क परिषद. परिषदेच्या ‘पृथ्वी मोबाइल क्लिनिक’ उपक्रमाच्या माध्यमातून अवघ्या पाच रुपयांमध्ये गरजूंसाठी आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमाचे १११ वे शिबिर नुकतेच झाले असून, आतापर्यंत १० हजार ७७ रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परिषदेच्या शहराध्यक्षा अपर्णा साठ्ये-मारणे, डॉ. आदिनाथ लांडे, डॉ. अनिकेत मडावी, अमित जागडे, अमोल चव्हाण या वेळी उपस्थित होते.

काय आहे हा उपक्रम

‘पाच रुपयांमध्ये आरोग्य तपासणी आणि औषधोपचार अशी आरोग्यसेवा सध्या पुण्यातील ६० ठिकाणी सध्या दिली जात आहे. यामध्ये दोन डॉक्टर, दोन परिचारिका, वाहनचालक, समन्वयक, दोन मदतनीस एवढे मनुष्यबळ कार्यरत आहेत. एमआरआय आणि सिटी स्कॅन यांसारख्या तपासण्या मोफत केल्या जात आहेत. गंभीर आजारांवर शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक वस्तीत महिन्यातून एकदा तपासणी व औषधोपचार केले जात आहेत.’

डाॅ. बाबा आढाव यांच्याकडून प्रेरणा

कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी हमाल पंचायतच्या माध्यमातून गरजंना पोटभर जेवण मिळावे या उद्देशातून कष्टाची भाकर हा उपक्रम सुरू केला. त्यामध्ये शहरात विविध ठिकाणी दहा रुपयांमध्ये झुणका-भाकर केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गरजूंना दर्जेदार उपचार, तपासण्या व मोफत औषधोपचार फक्त पाच रुपयांत देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत १०७ ठिकाणी या फिरत्या दवाखान्याने सेवा दिली आहे. रुग्ण हक्क परिषदेशी संलग्न असलेल्या ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून पृथ्वी मोबाइल क्लिनिक हा फिरता दवाखाना चालवला जात आहे. यासाठीच सर्व खर्च परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे, असे उमेश चव्हाण यांनी सांगितले.