पुणे : देशात सर्वांत परवडणारी घरे कोणत्या शहरात आहेत, हे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे. यंदा पहिल्या सहामाहीत परवडणाऱ्या घरांमध्ये अहमदाबादने पहिले स्थान पटकावले आहे. कोलकाता दुसऱ्या स्थानी, तर पुणे तिसऱ्या स्थानी आहे. घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत ईएमआय म्हणजेच गृहकर्जाचा मासिक हप्ता या तिन्ही शहरांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने तेथील घरे सर्वाधिक परवडणारी ठरली आहेत. मुंबईत मात्र घरे सर्वाधिक न परवडणारी ठरली आहेत.

नाइट फ्रँक इंडियाने देशातील प्रमुख शहरांतील परवडणाऱ्या घरांचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाचा मासिक हप्ता ५० टक्क्यांपर्यंत असल्यास ते घर परवडणारे ठरते. देशातील प्रमुख आठपैकी सहा शहरांमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने तेथील घरे परवडणारी आहेत. रिझर्व्ह बँकेचे व्याजदर सध्या दशकभरातील नीचांकी पातळीवर आहेत. यामुळे गृहकर्जाचा मासिक हप्ता कमी राहण्यास मदत होत आहे. मात्र, काही शहरांमध्ये घरांच्या किमतीतील वाढ जास्त असल्याने गृहकर्जाचा हप्ताही वाढला आहे. त्यातून तेथील घरे परवडणारी ठरत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या १० वर्षांत सर्वच शहरांमध्ये घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाचा मासिक हप्ता कमी होत आहे. मुंबईत हे प्रमाण दशकभरात ७७ वरून ६९ टक्क्यांवर आले आहे. याच वेळी पुण्यात ५७ वरून २८ टक्के, चेन्नई ५५ वरून २९ टक्के, हैदराबादमध्ये ४७ वरून ४१ टक्के, कोलकात्यात ४७ वरून २५ तर अहमदाबादमध्ये ४२ वरून २३ टक्क्यांवर आले आहे. मात्र, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये त्यात वाढ नोंदविण्यात आली असून, ती अनुक्रमे ६७ टक्के व ३५ टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

परवडणारे घर कसे ठरते?

परवडणारे घर ठरविताना त्या शहरातील विक्री होणाऱ्या घरांचा सरासरी आकार आणि किंमत गृहित धरली जाते. याच वेळी गृहकर्जाचा कालावधी २० वर्षे तर कर्जाची रक्कम घरांच्या किमतीच्या ८० टक्के धरली जाते. त्यानुसार गृहकर्जाचा सरासरी मासिक हप्ता ठरवला जातो. नंतर घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाचा हप्ता ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास घरे परवडणारी ठरतात.

किमती वाढल्याचा परिणाम

घरांची मागणी वाढण्यास ती परवडणारी असणे हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. घरांच्या किमती वाढत असल्याने ती परवडण्याचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, व्याजदर कमी असल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयाला बळ मिळताना दिसून येत आहे. रोजगारातील वाढ, उत्पन्नातील स्थिर वाढ आणि वित्तसाहाय्य यांचा सकारात्मक परिणाम घरांच्या परवडण्यावर होत आहे, अशी माहिती नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशीर बैजल यांनी दिली.

शहर – घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत ईएमआय (टक्क्यांत)

अहमदाबाद – २३
कोलकाता – २५
पुणे – २८
चेन्नई – २९
बंगळुरू – ३५
हैदराबाद – ४१
दिल्ली – ६७
मुंबई – ६९