पुणे : राज्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमात सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाने (एएफएमसी) विक्रमी कामगिरी केली. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ३४ सुवर्णपदके पटकावली आहेत. सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाने या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय हे देशातील एकमेव त्रिसेवा वैद्यकीय महाविद्यालय आहे.
देशातील सर्वोत्कृष्ट सरकारी वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये एएफएमसीचे नाव आघाडीच्या संस्थांमध्ये घेतले जाते. वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नेतृत्व विकास आणि लष्करी वैद्यकीय प्रशिक्षणातील उत्कृष्टतेसाठी या संस्थेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. जागतिक दर्जाचे वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देतानाच विद्यार्थ्यांना सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत मानाची कारकीर्द घडविण्याची संधी मिळते. एएफएमसीची एमबीबीएस पदवी ही केवळ शैक्षणिक पात्रतेशिवाय देशसेवेची संधी देणारी असल्याचे महाविद्यालयाने नमूद केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या २६व्या पदवी प्रदान सोहळ्यात एएफएमसीने ३४ सुवर्णपदके पटकावली. या कामगिरीमुळे महाविद्यालयाने शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची ही पावती आहे. भविष्यातही देशातील सैनिक आणि नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी सक्षम, नैतिक मूल्ये जपणारे आणि सेवाभावी वैद्यकीय व्यावसायिक घडविण्याच्या आपल्या ध्येयाशी एएफएमसी कटिबद्ध असल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले.
राज्यात १९९८मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे आहे. तसेच मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, लातूर येथे विभागीय केंद्रांची स्थापना विद्यापीठाने केली आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून, जवळजवळ ४००हून अधिक महाविद्यालये संलग्नित आहेत. त्यात शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.
