पुणे : देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना तातडीचे, प्रगत उपचार मिळण्यासाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (एएफएमएस) आणि बंगळुरू येथील ‘भारतीय विज्ञान संस्था’ (आयआयएससी) आता एकत्र काम करणार आहेत. या दोन संस्थांमध्ये करण्यात आलेल्या कराराच्या माध्यमातून ‘कॉम्बॅट मेडिसीन’साठीचे (युद्धकालीन वैद्यकशास्त्र) संशोधन करण्यात येणार असून, जवानासाठी आरोग्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) आणि वापरण्यासाठीची उपकरणे (वेअरेबल डिव्हाइसेस) विकसित करण्याची योजना आहे.
‘आयआयएससी’च्या आंतरविद्याशाखीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. नवकांत भट यांनी ही माहिती दिली. सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक व्हाइस अॅडमिरल आरती सरीन या वेळी उपस्थित होत्या. पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या आर्मेडिकॉन या परिषदेत एएफएमएस आणि आयआयएससी यांच्यात करार करण्यात आला.
डॉ. भट म्हणाले, ‘एएफएमसी’चे वैद्यकीय ज्ञान आणि ‘आयआयएससी’चा १०० वर्षांचा विज्ञान-तंत्रज्ञानाचा वारसा एकत्र आणून अनेक उपक्रम राबवण्याचे नियोजन आहेत. त्यात संरक्षण दलांच्या गरजांनुसार संयुक्त संशोधन व तंत्रज्ञान विकास, कार्यशाळा आणि परिषदा, पीएच.डीसह संयुक्त अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. ‘अंतराळ वैद्यकशास्त्रा’प्रमाणेच (स्पेस मेडिसीन) आता ‘युद्धकालीन वैद्यकशास्त्र’ (कॉम्बॅट मेडिसिन) या क्षेत्रात संशोधन केले जाणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत जखमी जवानांवरील तातडीने उपचार, त्यांच्या जखमा लवकर भरून येण्यासाठी प्रगत उपाययोजना, आपत्कालीन शस्त्रक्रिया आणि त्यानंतरचे पुनर्वसन अधिक प्रभावी करणे, या संदर्भात एकत्रित काम केले जाईल.
‘उपचार आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रांत एकाच वेळी काम करणारे ‘फिजिशियन सायंटिस्ट’ घडवण्यावरही भर दिला जाणार आहे. डॉक्टरांनी उपचारांसह स्वतः नवीन उपकरणे आणि तंत्रज्ञान विकसनाच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी ‘एएफएमसी’मधील डॉक्टर ‘आयआयएससी’मध्ये संशोधन करणार आहेत. त्यामुळे देशात ‘फिजिशियन सायंटिस्ट’ची एक नवी पिढी घडवणे शक्य होऊ शकेल,’ असे डॉ. भट यांनी नमूद केले.
‘गगनयान’चा अनुभव
‘आयआयएससी’ने या पूर्वी ‘स्पेस मेडिसीन’मध्ये योगदान दिले आहे. ‘गगनयान’ मोहिमेसाठी निवडलेल्या चारही अंतराळवीरांनी ‘आयआयएससी’मध्ये दोन वर्षांचा संशोधनाचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अंतराळात शरीरावर होणारे परिणाम आणि ‘शून्य गुरुत्वाकर्षण’ यातील आव्हानांवर त्यांनी संशोधन केले. याच धर्तीवर आता जवानांच्या शारीरिक समस्यांवर उपाय शोधण्यात येणार आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रम, डिजिटल रुग्णालय
‘डिजिटल रुग्णालय आयआयएससीतर्फे पहिल्यांदाच वैद्यकीय अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून पदव्युत्तर अभ्यासक्रम, पीएच.डी. राबवले जाणार आहेत. तसेच, डिजिटल रुग्णालय सुरू केले जाणार आहे. त्यात रुग्णांचे सर्व तपशील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवले जातील,’ असेही डॉ. भट यांनी नमूद केले.

