scorecardresearch

पुणे : १६ दिवसांनंतर खडकवासला धरणातून विसर्ग थांबविला

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली.

पुणे : १६ दिवसांनंतर खडकवासला धरणातून विसर्ग थांबविला
खडकवासला धरण(संग्रहीत छायाचित्र)

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे तब्बल १६ दिवसांच्या कालावधीनंतर खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग शुक्रवारी थांबविण्यात आला. या धरणातून आतापर्यंत तब्बल १५.०८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी नदीत सोडण्यात आले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून २९.१५ टीएमसी म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराची पिण्याचे आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा हंगामात १२ जुलै रोजी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर जुलैअखेर पाऊस ओसरला होता. त्यामुळे विसर्ग थांबविण्यात आला होता. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा दमदार पावसाने पुनरागमन केले. त्यामुळे पानशेत धरण ११ ऑगस्ट, तर वरसगाव हे धरण १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. त्यामुळे या दोन्ही धरणांमधून पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. परिणामी खडकवासला धरणातून ११ ऑगस्टपासून आतापर्यंत सलग पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू होता. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने हा पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही १०० टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे या धरणातूनही पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांच्या परिसरातही पावसाने विश्रांती घतेली आहे, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After 16 days discharge from khadakwasla dam was stopped pune print news amy

ताज्या बातम्या