पिंपरी : समाजमाध्यमात ‘रील स्टार’ असलेल्या प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्यानंतर पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्याच्या मागणीसाठी मद्यपान करून घरी आलेल्या प्रियकराचे हात-पाय ओढणीच्या साहाय्याने बांधून लाकडी बॅटने मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना १२ जून रोजी मावळ तालुक्यातील इंदोरी गावात घडली. याप्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
कमल रामदयाल मधुकर (वय ३०, इंदोरी, मावळ. मूळ रा. बिलासपूर, छत्तीसगड) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी कमल याच्या बहिणीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संध्या पवार (वय ३०, इंदोरी, मावळ) हिला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या ही समाजमाध्यमात ‘रील स्टार’ आहे. ती विवाहित असून, तिला एक मुलगी आहे. घरासमोरील एका फार्म हाऊसवर ती मजुरीचे काम करते, तर कमल हा देखील मागील दोन वर्षांपासून त्याच फार्म हाऊसवर काम करत होता.
एकत्र काम करत असल्याने कमल यांची संध्याच्या घरी ये-जा होती. दोघांमध्ये मैत्री आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कमल दोन महिन्यांसाठी त्याच्या मूळ गावी छत्तीसगडला गेला. पुन्हा इंदोरी येथे आल्यानंतर त्याने संध्याकडे पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, संध्याने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी नकार दिला. कमलने दोघांची चित्रफीत, छायाचित्रे असल्याचे सांगितले. ते हटविण्याची विनंती संध्याने केली. मात्र, त्याने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. १२ जून रोजी रात्री दहा वाजता कमल हा संध्याच्या घरी गेला. त्यांच्यात वाद झाला. संध्याने कमल याचे हातपाय ओढणीच्या साहाय्याने बांधले. लाकडी बॅटने कमलला मारहाण करून गंभीर जखमी केले. कमल बेशुद्ध पडल्याने संध्या त्याला घेऊन रुग्णालयात जात होती. मात्र, रस्त्यातच कमलचा मृत्यू झाला. पोलिसांनी संध्याला अटक केली असून, तिला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.