मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातही काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. शहर काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीत स्वबळाचा नारा देत एकमताने तसा निर्णय घेण्यात आला. आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील आणि काँग्रेस संपूर्ण शहरात पोहोचण्यास मदत होईल, असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याने महाविकास आघाडी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे : आयटीआय इन्स्ट्रक्टर, रेल्वेची भरती परीक्षा एकाच वेळी

शहर जिल्हा काँग्रेसच्या सुकाणू समितीची (कोअर कमिटी) बैठक काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातील रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत सर्व नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला.आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान होईल, असे मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत मदत होत नाही, अनेकदा काँग्रेसच्या विरोधातही काम केले जाते. त्यामुळे आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नाही, अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली. यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात नव्हते, तर बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले होते, ही बाबही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली.निवडणुकीत उमेदवारी देताना काटेकोर विचार व्हावा, अशी सूचना माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली. अनेक जण निवडणुकीतील उमेदवारीपुरते पक्षाकडे येतात. यामुळे पक्षाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अशांना उमेदवारी देण्यात येऊ नये, पाच वर्षे पक्षाच्या झेंड्याखाली नियमित कार्यक्रम घेणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी प्राधान्याने विचार व्हावा, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : आयटीआय इन्स्ट्रक्टर, रेल्वेची भरती परीक्षा एकाच वेळी

महाविकास आघाडीत बिघाडी
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यात येईल, असे नाना पटोले यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ पुण्यातही स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत काही महिन्यांपूर्वी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याच सन्मानाने आणि योग्य पद्धतीने जागा वाटप झाले तरच आघाडी करू अशी भूमिका शिवसेनने जाहीर केली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

आगामी महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची तसेच पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरुवात करावी अशा सूचनाही देण्यात आली आहे.- अरविंद शिंदे, प्रभारी शहराध्यक्ष, काँग्रेस